सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यातील ‘या’ प्रभागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज
आता संपूर्ण पुण्यातच हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. | Pune herd immunity
![सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यातील 'या' प्रभागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यातील 'या' प्रभागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2020/11/03153651/corona_nalanda.jpg?w=1280)
पुणे: राज्यातील सर्वाधिक कोरोना प्रादुर्भावाच्या मुख्य केंद्रांपैकी एक असणाऱ्या पुण्यात आता हर्ड इम्युनिटीची (herd immunity) लक्षणे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत इतक्यात ठोस निष्कर्ष काढता येणार नसला तरी हे संकेत आशादायी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. देशात पहिल्यांदाच एखाद्या शहरात हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (First signs of herd immunity in Pune)
पुण्यातील पाच प्रभागांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट याच काळात याच प्रभागांमध्ये सिरो सर्व्हे झाला होता. तेव्हा या प्रभागांमधील जवळपास 51 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी लोहिया नगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आली आहेत.
सिरो सर्व्हेमध्ये लोहिया नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता या प्रभागातील कोरोना झालेल्या 85 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडिज निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात याठिकाणी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे लोहिया नगरमध्ये कोरोनावर मात करणारी हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे आता संपूर्ण पुण्यातच हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे का, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. मात्र, याबाबत इतक्या घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. पुण्यात हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे, हे आपण इतक्यात ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, लोहिया नगर प्रभागातील सर्वेक्षणाचे निष्कर्ष महत्त्वपूर्ण आहेत.
सिरो सर्वेक्षणात सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात नंतरच्या टप्प्यात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावतो, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. मात्र, त्यामुळे पुणेकरांनी लगेचच सर्व नियम पाळायचे सोडून देता कामा नये. कारण, लोकांनी योग्य काळजी घेतली नाही तर दिल्लीप्रमाणे पुण्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले.
दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवशी 14 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह दिवाळीमध्ये बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे पुण्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी झालेल्या तपासणीत पुण्यात 2 हजार 743 जणांची कोरोना चाचणी केली असता यापैकी 384 जण पॉझिटिव्ह आले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे. 10 टक्क्यांच्या आत आलेला शहराचा पॉझिटिव्ह दर आता 13 टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे.
संबंधित बातम्या:
कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार
Pune | 50 हजार टेस्ट किट, अडीच हजार खाटा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज
(First signs of herd immunity in Pune)