देशातील 8,324 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 33 हजारांवर : आरोग्य मंत्रालय
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 33 हजार 50 वर पहोचली आहे (India Corona Recovery rate). यापैकी 8 हजार 324 रुग्ण बरे झाले आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 33 हजार 50 वर पहोचली आहे (India Corona Recovery rate). यापैकी 8 हजार 324 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 हजार 75 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 हजार 718 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 23 हजार 651 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते (India Corona Recovery rate).
#COVID19– 1718 new cases have been reported in the last 24 hours, taking the total number of cases to 33050. The recovery rate is now 25.19%. A progressive recovery rate has been observed: Lav Agrawal, Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/jHZtD4T5Gm
— ANI (@ANI) April 30, 2020
देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 25.18 टक्क्यांवर
देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 25.18 टक्क्यांवर पोहोचलं आहे. हेच प्रमाण 14 दिवसांपूर्वी 13.06 टक्के इतकं होतं. ही एक सकारात्मक बाब आहे. देशाचा कोरोना डेथ रेट 3.2 टक्के आहे. यापैकी 78 टक्के रुग्णांमध्ये कोरोनासोबतच अनेक विविध प्रकारचे आजार असल्याची माहित समोर आली आहे, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
देशाचा डब्लिंग रेट 11 वर पोहोचला
देशाचा डब्लिंग रेट 11 वर पोहोचला आहे. डब्लिंग रेट म्हणजे रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचं प्रमाण. देशातील रुग्णांची संख्या आता 11 दिवसांनी दुप्पट होते. सुरुवातीला हे प्रमाण 3.41 होतं, हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर, उडीसा, राजस्थान, तमिळनाडू, पंजाब या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा डब्लिंग रेट हा 11 ते 20 दिवसांवर पोहोचला आहे. लडाख, कर्नाटक, हरयाणा, उत्तराखंड आणि केरळ या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा डब्लिंग रेट हा 20 ते 40 दिवसांवर पोहोचलं आहे. तर आसाम, तेलंगणा, छत्तीसग आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचाय डब्लिंग रेट हा 40 दिवसांपेक्षा जास्त दिवसांवर पोहोचला आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांकडे गृह मंत्रालयाचं लक्ष
दरम्यान, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांकडे गृह मंत्रालयाचं लक्ष असणार आहे. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन केलं जावं, असे आदेश देण्यात आले आहेत. बसेसचं सॅनिटायजेशन केलं जाईल. आपापल्या राज्यांमध्ये पोहोचणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल आणि त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सचिव आणि प्रवक्त्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.