Health University Admission|आरोग्य विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषद यांची मान्यता आहे.
नाशिकः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2021-2022 करिता विद्यापीठाच्या एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 07 जानेवारी 2022 पर्यंत आहे.
येथे अभ्यासक्रम सुरू
विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय पुनर्वसन परिषद यांची व अभ्यासक्रमासंदर्भात राज्य शासनाचे मार्गदर्शक सूचनांन्वये मान्यता आहे. विद्यापीठाचे संलग्नित पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज येथील ससून हॉस्पिटल कॅम्पस आहे. याठिकाणी महाराष्ट्र मेंटल हेल्थमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रवेश परीक्षा होणार
एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमास प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी व अभ्यागतांसाठी www.muhs.ac.in या संकेतस्थळावर एम.फिल इन क्लिनिकल सायकोलॉजी अभ्यासक्रमासंदर्भात माहिती उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी…
अभ्यासक्रमासंदर्भात शैक्षणिक पात्रता, नोंदणी शुल्क, प्रवेश क्षमता, आरक्षण, परीक्षेचे स्वरुप, नियमावली, प्रवेश अर्ज इत्यादी माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर अधिसूचना क्र. 43/2021 मध्ये देण्यात आली आहे. एम.फिल. इन क्लिनिकल सायकोलॉजीबाबत अधिक माहितीसाठी पालक, विद्यार्थी व अभ्यागतांनी 253-2539196 किंवा 0253-2539206 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. गुणवत्तापुर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.
शुल्कात सवलत
विद्यापीठाच्या संलग्निकरण नूतनीकरण प्राप्त प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. कोविड-19 आजाराची स्थिती पाहता यातील काही अभ्यासक्रमांसाठी निर्धारित शुल्क भरण्यासाठी 50 टक्के शिथिलता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगले व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. पात्रताधारक विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने विद्यापीठाच्या फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश
वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, तत्सम विद्याशाखेचे फेलोशिप व प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच सर्टीफिकेट कोर्स इन इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टीफिकेट कोर्स इन ऑपरेशन थेअटर टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन रेडिओग्राफी टेक्नोलॉजी, सर्टीफिकेट कोर्स इन टेक्नीशियन, रेस्पायरेटरी थेरपिस्ट इन इंटेन्सिव्ह केअर, सर्टीफिकेट कोर्स इन क्रिटीकल केअर डायलासिस, सर्टीफिकेट कोर्स फॉर टेक्निशियन इन पल्मनरी फंक्शन टेस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन ई.सी.जी. टेक्नीशियन असिस्टन्ट, सर्टीफिकेट कोर्स इन पंचकर्म थेरपिस्ट, सर्टीफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टीफिकेट कोर्स फॉर क्लिनिकल इन मेडिको लिगल प्रॅक्टीस, सर्टीफिकेट कोर्स इन होमिओपॅथी फार्मसी, सर्टीफिकेट कोर्स इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात आले आहेत.
इतर बातम्याः
Nashik Corona Restrictions|आमदार, झेडपी अध्यक्षांच्या मुलांच्या लग्नात कोरोना निर्बंधांचा फज्जा