गणिताचा शिक्षक ते हिजबुलचा टॉप कमांडर, 12 लाखांचं बक्षीस असलेला रियाज नायकू चकमकीत ठार
कुख्यात दहशतवादी रियाज नायकू याला कंठस्नान घालण्यात (Riyaz Naikoo killed in Kashmir) भारतीय सुरक्षा दलांना यश आलं आहे.
श्रीनगर : कुख्यात दहशतवादी रियाज नायकू याला कंठस्नान घालण्यात (Riyaz Naikoo killed in Kashmir) भारतीय सुरक्षा दलांना यश आलं आहे. रियाज नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर होता. केंद्र सरकारकडून त्याच्यावर 12 लाख रुपयाचं बक्षिस घोषित करण्यात आलं होतं. अखेर आज (6 मे) पुलवामा जिल्ह्यातील त्याच्या गावात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत नायकू मारला गेला (Riyaz Naikoo killed in Kashmir).
रियाज नायकू हा कधीकाळी गणिताचा शिक्षक होता. मात्र, तो हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि कुख्यात दहशतवादी बनला. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर तो प्रचंड चर्चेत आला. तो आपल्याबरोबरीच्या तरुणांना देशाविरोधात भडकावत असे. सद्दाम पोद्दार या दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर तो हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बनला. त्याने काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील 12 तरुण मुलांची मनं वळवून हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील केलं होतं.
देशाविरोधात लोकांना भडकवण्यासाठी बुरहान वानी सोशल मीडियाचा जास्त वापर करायचा. तोच पायंडा रियाज नायकूने सुरु ठेवला. नायकू हा भारतीय सैन्यदलाच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. याशिवाय तो काश्मीरी दहशतवादाचा भारतीय चेहरा होता.
नायकू हा लपण्यात आणि पळून जाण्यात माहीर होता. तो भारतीय सैनिकांच्या जाळ्यात बऱ्याचदा अडकला. मात्र, सैनिकांना चकवा देत तो पळून जाण्यात यशस्वी ठरायचा. भारतीय सुरक्षा दलांना मंगळवारी रात्री गुप्तचर यंत्रणेकडून नायकू संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने ही माहिती कितपत खरी आहे? याबाबत शाहनिशा केली. विविध ठिकाणांची पाहणी केली.
सुरक्षा यंत्रणेकडून मंगळवारी रात्री कॉर्डन सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. हे ऑपरेशन सकाळपर्यंत चाललं. अखेर सकाळी नऊ वाजता दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत नायकूसह त्याचा आणखी एक जोडीदार मारला गेला.
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रियाज नायकूचं गाव आहे. तो आईच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी गावात आला होता, अशी माहिती समोर आली होती. नायकूचा एन्काउंटर हा हिज्बुल मुजाहिद्दीनसाठी मोठा झटका आहे.
हेही वाचा :
नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी
मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली