पुण्यात ‘सैराट’, आंतरजातीय लग्न केल्यानं बहिणीच्या पतीवर गोळीबार
पुणे : काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर नुकतंच पुण्यातील चांदणी चौकात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यात पीडित तरुण तुषार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे पुण्यासारख्या शहरातही ‘सैराट’ची पुनरावृत्ती होत आहे. […]
पुणे : काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर नुकतंच पुण्यातील चांदणी चौकात आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बहिणीच्या पतीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. यात पीडित तरुण तुषार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे पुण्यासारख्या शहरातही ‘सैराट’ची पुनरावृत्ती होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांपूर्वी विद्या आणि तुषार यांनी आंतरजातीय लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाला विद्याच्या घरच्यांचा विरोध होता. पण विद्याने घरच्यांचा विरोध डावलून तुषारसोबत लग्न केल्याने तिच्या भावांना प्रचंड राग आला. त्याच रागातून तिच्या भावांनी काल (8 मे) रात्री चांदणी चौकातील पेट्रोल पंपजवळ तुषारला गाठले. त्यानंतर आरोपींनी तुषारवर पाच गोळ्या झाडल्या. या गोळीतील तीन गोळ्या तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीत लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी मराणावस्थेत असलेल्या तुषारला शिवीगाळ करत घटनास्थळावरुन पळ काढला.
यानंतर काही स्थानिकांनी तुषारला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणानंतर नुकतंच बहिणीच्या पतीवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण हे विद्याचे भाऊ असून, आकाश लहू तावरे, सागर लहू तावरे , सागर रामचंद्र पालवे अशी या तिघांची नावे आहेत.
दरम्यान अवघ्या तीन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या पारनेर येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलीसह जावयाला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यात मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली. त्यामुळे तिचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला होता.
पीडित मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे आहे, तर मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांनी 6 महिन्यांपूर्वीच आंतरजातीय लग्न केले होते. मात्र, या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. अखेर विरोध डावलून लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलीचे मामा आणि वडिलांनी मुलीसह जावयाला ढवळे वस्ती येथे घरात कोंडले. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. यात दोघेही मोठ्या प्रमाणात भाजले. मुलीचा उपचारदरम्यानच मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :
नगरमध्ये “सैराट”, आंतरजातीय लग्न केल्यानं मुलीसह जावयाला पेटवलं