कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तडफडणाऱ्या ‘पिहू’साठी विनोद कापरी सरसावले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नवजात बाळ तडफडत असलेला एक व्हिडीओ ट्विटरवर पाहिला आणि पत्रकार, सिनेदिग्दर्शक विनोद कापरी यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नवजात बाळ तडफडत असलेला एक व्हिडीओ ट्विटरवर दिसला आणि पत्रकार, सिनेदिग्दर्शक विनोद कापरी यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला. फेसबुक, ट्विटर रोज अनेक फेक व्हिडीओ शेअर होत असतात. मात्र, नवजात बाळाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ पाहून विनोद कापरींनी न राहून, त्या व्हिडीओची सत्यता तपासून, त्यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आणि सुरु झाला ‘पिहू’च्या पुनर्जन्माचा प्रवास…
राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील बरनेलमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक नवजात बाळ कुणीतरी टाकून गेलं होतं. हे नवजात बाळ अवघ्या काही तासांचं होतं. त्यामुळे त्याची तडफड कुणाही संवेदनशील माणसाला आतून-बाहेरुन हेलावून टाकणारी होती. या बाळाला बरनेलमधील ग्रामस्थांनी जवळील प्राथमिक उपचार केंद्रात नेलं. त्यानंतर तिथून बाळाला नागौर येथील जेएलएन हॉस्पिटलला हलवण्यात आले.
ये चीख़ अब और नहीं सुनी जा सकती। कोई जानकारी हो तो बताइए।हम इस बच्ची को अपने जीवन का हिस्सा बनाना चाहेंगे। @sakshijoshii pic.twitter.com/KQokFKJf8P
— Vinod Kapri (@vinodkapri) June 14, 2019
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तडफडणाऱ्या नवजात बाळाचा व्हिडीओ @KMsharmaINC या हँडलवरुन सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ विनोद कापरी आणि साक्षी जोशी या दाम्पत्याने पाहिला आणि त्यांच्यातील संवेदनशील आई-वडिलांचे हृदय पिळवटून गेलं. कापरी दाम्पत्याने तातडीने या बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ट्विटरच्या माध्यमातून नवजात बाळाची माहिती देण्याचं आवाहन विनोद कापरी आणि साक्षी जोशी यांनी केले.
विनोद कापरी हे पत्रकार आहेत. टीव्ही 9 भारतवर्षचे ते माजी समूह संपादक होते. तसेच पिहू, मिस टणकपूर हाजीर हो यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. तर साक्षी जोशी या विनोद कापरी यांच्या पत्नी आहेत. तसेच, त्या पत्रकार आणि अँकर आहेत.
विनोद कापरी आणि साक्षी जोशी यांनी केवळ बाळाला शोधण्याचं आणि माहिती देण्याचेच आवाहन केले नाही, तर हे बाळ सापडल्यानंतर त्याला आपण दत्तक घेऊ इच्छित आहोत. बाळाचं पालन-पोषण करु इच्छित आहोत. आम्हाला बाळाला अशा अवस्थेत पाहावत नाही, असे म्हणत बाळाला ‘पिहू’ असेही नाव दिले.
Just had a chat with Dr RK Sutaar of JLN Hosptal , Nagaur , Rajasthan. As per Dr Sutaar , little angel is doing fine. Her 1.6 kg weight is cause of concern. Please keep praying for this little one. Heart breaking !!! Thanks a ton Dr Sutaar and team. #PrayForPihu pic.twitter.com/NAsCXVUygN
— Vinod Kapri (@vinodkapri) June 14, 2019
अवघ्या काही तासात विनोद कापरी यांनी विविध व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून बाळाचा शोध घेतला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तडफडणारं बाळ राजस्थानमधील होतं. बाळाला स्थानिकांनी नागौर जिल्ह्यातील जेएलएन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.
बाळ नागौर जिल्ह्यातील जेएलएन हॉस्पिटलमध्ये असल्याचे लक्षात येताच, विनोद कापरी आणि साक्षी जोशी दाम्पत्य नोएडाहून थेट नागौरला पोहोचले. या दोघांमधील संवेदनशील माणूस त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यांनी बाळाची चौकशी केली. बाळ दोन किलोंचं होतं आणि श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होत होता. मात्र, बाळाची प्रकृती तशी स्थिर होती, अशी माहिती विनोद कापरी यांना डॉक्टरांनी दिली आणि त्यांच्या जीवात जीव आला.
A hug from ALL of you to little angel … So divine … pic.twitter.com/a8xDMhDnj5
— Vinod Kapri (@vinodkapri) June 16, 2019
विनोद कापरी यांनी या बाळाला ‘पिहू’ असे नाव दिले आणि त्यानंतर बाळाला दत्तक घेण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली. भारतात कुणाही मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. विनोद कापरी यांनी ट्विटरवरुन वारंवर तसे बोलूनही दाखवले. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न अद्याप सोडले नाहीत.
आता विनोद कापरी आणि साक्षी जोशी हे ‘पिहू’ला दत्त घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ट्विटरवरुनच अनेक जणांनी त्यांना या प्रक्रियेत मदत करण्यचं आश्वासनही दिले आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया किचकट असली तरी ती पूर्ण करुन, ‘पिहू’ला घरी घेऊन जाणार असल्याचे विनोद कापरी यांनी सांगितले.
विनोद कापरी आणि साक्षी जोशी यांच्या या मानवतेच्या सर्वोच्च गुणाचं सध्या सोशल मीडियासह सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.