नागपूर मेट्रोवरुन श्रेयवाद, फडणवीसांकडून मोदींचे आभार, केदार म्हणाले विलासरावांची संकल्पना, राऊतांकडून पृथ्वीबाबांना श्रेय
सीताबर्डी ते लोकमान्यनगर ही मेट्रो असून, 11 किलोमीटरचा मेट्रोमार्ग आहे. या मार्गावर एकूण 11 स्टेशन असून आजपासून सहा मेट्रो स्टेशन सुरु होत आहेत.

नागपूर : नागपूर मेट्रो ॲक्वा लाईनचं लोकार्पण (Nagpur Metro) आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री सुनील केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला हजेरी लावली. (Nagpur Metro)
सीताबर्डी ते लोकमान्यनगर ही मेट्रो असून, 11 किलोमीटरचा मेट्रोमार्ग आहे. या मार्गावर एकूण 11 स्टेशन असून आजपासून सहा मेट्रो स्टेशन सुरु होत आहेत. हिंगणा शहरातील प्रवासी, MIDC कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी श्रेयवादावरुन चांगलीच जुगलबंदी रंगली. सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित असल्याने, प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपणच ही मेट्रो आणल्याचा दावा केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मेट्रो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तर काँग्रेस नेते आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मेट्रोची मूळ संकल्पना ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडल्याचा दावा केला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर मेट्रोच्या प्रस्तावावर सही केली होती, त्यामुळे आज मेट्रोचा हा कार्यक्रम होत असल्याचं नमूद केलं.
तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागे लागून या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केल्याचं म्हणत, आपलाही दावा दाखल केला.
उद्घाटनप्रसंगी कोण काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. कारण नागपुरात तातडीने मेट्रोची सिस्टीम दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष देऊन, राज्य आणि केंद्र सरकरकडून हे काम पूर्ण करून घेतले. मात्र आता मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की उपनगरांना जोडणाऱ्या दुसऱ्या टप्प्याला राज्य सरकारनं लवकरात लवकर मान्यता मिळवून त्यातील अडचणी दूर कराव्यात, गती द्यावी ही विनंती, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
क्रीडामंत्री सुनील केदार
आम्ही मंचावर बसलेले नेते वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी विकासकामाच्या बाबतीत आम्ही एकत्रित आहोत, हे आम्ही राज्याला दाखवून दिले आहे. मेट्रोची मूळ संकल्पना ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडली होती, असं सुनील केदार यांनी नमूद केलं.
पालकमंत्री नितीन राऊत
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर मेट्रोच्या प्रस्तावावर सही केली होती, त्यामुळे आज मेट्रोचा हा कार्यक्रम होत आहे. नागपूर मेट्रोच्या जाहिरातीत नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्र्याची नावं नाहीत याची दखल मेट्रोने घ्यायला हवी. देवेंद्र फडणवीस मूळ नागपुरचे आहेत, पण त्यांच्या कार्यकाळात नागपुरात मोठे उद्योग आले नाहीत, याचं संशोधन करावं लागेल. त्याशिवाय मेट्रो चालणार नाही, असं नितीन राऊत म्हणाले.
नितीन गडकरी यांनी दरवर्षी 50 हजार बेरोजगारांना ‘मिहान’मध्ये नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं ते काम आपण मिळून करु, असाही टोला नितीन राऊतांनी गडकरींना लगावला.
गृहमंत्री अनिल देशमुख
नागपूर मेट्रोची खरी सुरुवात ही विलासराव देशमुख यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागे लागून या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले. पुण्याच्या आधी हा प्रकल्प करावा यासाठी प्रयत्न केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घालून हा प्रकल्प पुढे नेला, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांनी श्रेय दिलं.
नागपूर शहरातील बदलाची सुरुवात ही विलासराव देशमुख यांनी केली. आयआरडीपीच्या माध्यमातून त्यांनी नागपूरच्या विकासाचा आराखडा आखला. गेल्या पाच वर्षातसुद्धा फडणवीस सरकारने नागपूरच्या विकसात हातभार लावला. मुंबई नाईट लाईफ नंतर आता नागपुरातही मागणी होऊ लागली आहे. नागपुरात सुद्धा नाईट लाईफ सुरु करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
मेट्रोच्या उद्घाटन जाहिरातमध्ये नागपूरच्या मंत्र्यांची नावे नाही, ही चूक पुन्हा करू नका, असा दमही त्यांनी मेट्रो प्रशासनाला दिला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नागपूरसारखीच गडचिरोलीतही मेट्रो व्हावी, मागास गडचिरोली जिल्हा इतर जिल्ह्यांशी जोडला जावा. मेट्रो गडचिरोलीपर्यंत गेली पाहिजे. त्यामुळे त्या भागात बॅकलॉग भरून निघेल, नक्षलवाद संपण्यास मदत होईल. अशा प्रकल्पाची नागपूर आणि विदर्भाला गरज आहे. त्यामुळं अशा प्रकल्पात कुठल्याही अडचणी येणार नाही याची काळजी घेऊ, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद, याचं श्रेय जनतेला, कोणत्याही विकासकामाला विरोध करणार नाही हे वचन. विकासाचा वेग नक्कीच साधू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.