पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास
पिंपळगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते.
नाशिकः पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते.
केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
कारवाईवर माजी आमदारांचा आक्षेप
पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई केली. या कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे. या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात आयकरने कारवाई केली. त्यामुळे कांद्याच्या भावात हजार ते दीड हजाराची घसरण केली. आपण कुठल्याही नियमबाह्य कामाचे समर्थन करणार नाही. मात्र, केवळ दरवाढ झाल्यावरच छापेमारी करणे योग्य नाही. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई?
अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला ही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्यात वाढ होत कांद्याचे बाजार भाव लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये चार हजार रुपयांच्यावर गेले. त्यामुळे किरकोळ बाजारात दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावाचा भडका उडाला. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाने ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र, या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इतर बातम्याः
‘देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा’, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
IND vs PAK, T20 World Cup 2021: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वी फॅन्स भिडले, टीव्ही फोडण्यावरुन डिवचलं#TeamIndia #T20WorldCup2021 #INDvPAK #IndvsPak #India #ViratKohli https://t.co/r5KiuLwfs7
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021