जम्मूतील ऐतिहासिक चौकाला ‘भारत माता’ नाव, तर सर्क्यूलर रोडवरील चौकाला ‘अटलजी चौक’ अशी ओळख
केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधील दोन चौकांचं नाव बदलण्यात आलं आहे. जम्मू महानगरपालिकेनं (Jammu Municipal Corporation) हा निर्णय घेतला आहे.
श्रीनगर : केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधील दोन चौकांचं नाव बदलण्यात आलं आहे. जम्मू महानगरपालिकेनं (Jammu Municipal Corporation) हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जम्मूतील ऐतिहासिक सिटी चौकाचं नाव ‘भारत माता चौक’ करण्यात आलं आहे. तर सर्क्यूलर रोडवरील चौकाचं नाव ‘अटलजी चौक’ असं ठेवण्यात आलं आहे.
जम्मू महापालिकेच्या या निर्णयाचं बहुसंख्य नागरिकांनी स्वागत केलं आहे. तर काही नागरिक नाराज आहेत. महापालिकेनं चौकाचं नाव बदलण्यापेक्षा विकास आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं तर बरं होईल, असं नाराज नागरिकांचं मत आहे.
नाव बदलण्यात आलेल्या जम्मू चौकाचा मोठा इतिहास आहे. या चौक परिसरात बाजार आहे. त्यामुळे या चौकाशी अनेकांचा रोजगार जुडला आहे. दरम्यान, जम्मूतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि जम्मू महापालिकेच्या उपमहापौर पौर्णिमा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“जवळपास चार महिन्यांपूर्वी मी महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात सिटी चौकाचं नाव भारत माता चौक करावं, अशी जनतेची मागणी आहे, असं सांगितलं होतं. अखेर हा प्रस्ताव मान्य झाला. त्यामुळे सिटी चौकाचं नाव आता भारत माता चौक करण्यात आलं आहे”, असं पौर्णिमा शर्मा म्हणाल्या.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या उप राज्यपाल जीसी मुर्मू यांनी शनिवारी (29 फेब्रुवारी) कठुआ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान “जम्मू-काश्मीरमधील कुणाचीही जमीन आणि नोकरी जाणार नाही. त्यामुळे कुणाला तसं वाटत असेल तर ते मनातून काढून टाका”, असं मुर्मू यांनी सांगितलं. त्याचबरोबर “जम्मूतील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून सर्व अधिकारी यासाठी काम करत आहेत”, असंदेखील मूर्मू यांनी सांगितलं.
हेही वाचा – विदर्भातून विधानपरिषदेसाठी चुरस, जुन्यांना संधी की नव्यांना लॉटरी?