काबूल : अफगानिस्तानच्या काबूल विद्यापीठात आज (2 नोव्हेंबर) अतिरेक्यांनी हल्ला केला (Kabul Terrorist Attack). या हल्ल्यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 40 पेक्षा जास्त व्यक्ती जखमी आहेत. सध्या सुरक्षादल आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु आहे. पोलिसांनी महाविद्यालयाला चारही बाजूंनी घेरलं आहे. कॅम्पसच्या आतमधून अजूनही गोळीबाराचा आवाज येत आहे.
काबूल विद्यापीठात आज एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सुरु असताना अतिरेक्यांनी महाविद्यालयात शिरुन अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी महाविद्यालयात इतरही वर्ग सुरु होते (Kabul Terrorist Attack).
या हल्ल्याला अनुभवलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. हल्लेखोरांनी काबूल महाविद्यालयातील एका वर्गात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांवर अंदाधुद गोळीबार सुरु केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर काही गंभीर जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. दरम्यान, या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आलं आहे. अतिरेक्यांना पकडण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. गेल्या पाच ते सहा तासांपासून सुरक्षादल आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गनी यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे.
याआधीदेखील काबूल महाविद्यालयात अतिरेकी हल्ला झाला आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर झालेल्या बॉम्ब स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, काबूल हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. तालिबानने देखील या घटनेवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.