वादग्रस्त वक्तव्य भोवलं, वारिस पठाण यांना पोलिसांची नोटीस
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे (Karnataka Police notice to Waris Pathan).
बंगळुरु : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन (AIMIM) अर्थात एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे (Karnataka Police notice to Waris Pathan). या नोटीसमध्ये पठाण यांना 29 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम. एन. नागराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आम्ही 15 कोटी असलो तरी 100 वर भारी आहोत असं म्हणत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत भाष्य केलं होतं. कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या सभेत वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांनी वारिस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा कलम 117,153 (प्रक्षोभक भाषण) आणि कलम 153 ए ( समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज पोलिसांनी पठाण यांना नोटीस बजावली आहे (Karnataka Police notice to Waris Pathan).
कर्नाटकातील गुलबर्गा इथे 19 फेब्रुवारी रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जाहीर सभेच आयोजन करण्यात आलं होतं. त्या रॅलीत वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान केलं.
वारिस पठाण काय म्हणाले होते?
कर्नाटकातल्या गुलबर्गा इथे वारिस पठाण यांनी जाहीर भाषणात वादग्रस्त विधान केलं. “आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना. इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत. स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या”, असं चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं.
वारिस पठाण यांचं स्पष्टीकरण
याप्रकरणी वारिस पठाण यांनी 22 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं होतं. “आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेलाय. यामागे एक राजकीय षडयंत्र आहे. मी एक सच्चा भारतीय असून माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो”, असं वारिस पठाण पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
संबंधित बातम्या :