ठाणे : कल्याण-डोंबिवली शहरातील फुटपाथवर असलेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढा, अन्यथा कायदेशीररीत्या अतिक्रमण काढणारच आणि दंडात्मक कारवाईदेखील करणार, असा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकानदारांसह फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांना दिला आहे. केडीएमसीकडून 1 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरु केली जाणार आहे, अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली (KDMC commissioner Vijay Suryawanshi warn hawker).
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर नागरीक चालू शकत नाहीत. फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे (KDMC commissioner Vijay Suryawanshi warn hawker).
शहरातील मुख्य रस्ते विशेष म्हणजे डोंबिवली आणि कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा उभी करतात. फेरीवाले फुटपाथवर बसतात. जो फूटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य आणि बोर्ड मांडून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. विशेष करुन महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वादही झाला आहे.
आता केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबाबत घोषणा केली आहे. “1 नोव्हेंबरपासून महापालिकेकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे केले जाणार आहेत. सर्व दुकानदारांनी आणि ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे. महापालिका 1 तारखेपासून अतिक्रमण काढले जाईल. तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल”, असं विजय सुर्यवंशी यांनी सांगितलं.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन