जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (terrorist attack) महाराष्ट्राच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथल्या यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं आहे.
यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यश यांचा मित्राशी केलेला अखेरचा संवाद समोर आला आहे. यामध्ये 'आमचं काय आज आहे तर उद्या नाही' असं यश यांनी मित्राला म्हटलं आहे.
यश यांच्या या अखेरच्या मेसेजमुळे संपूर्ण मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.
खरंतर, यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.