संतोष देशमुख हत्येप्रकरणी मनोज जरांगेंची मोठी मागणी, आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी मोठी आणि महत्त्वाची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) आणि धनंजय देशमुख (Dhanajay Deshmukh) यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली आहे. या भेटीत दमानिया आणि देशमुख यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मस्साजोजचे सरपंज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मुद्दा लावून धरला असून या खटल्यात माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावं, अशी मागणी केली आहे.
वाल्मिक कराड काटे बाजूला करायचा
मनोज जरांगे हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करायल हवे. कारण तेच कर्तेकर्वीते आहेत. त्यांना एवढे सारे पैसे कशाला हवे होते? खून करून, जमिनी हडपून लोकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि याच पैशांतून सत्ता उपभोगायची असे चालू होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रमांक एकचा आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या रस्त्यावरील काटे बाजूला सारण्याचे काम करायचा. पैसेदेखील तोच गोळा करायचा, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केले.
…असे धनंजय मुंडे छातीठोकपणे सांगतात
पैसे धनंजय मुंडे यांनाच लागायचे. धनंजय मुंडे हेच मुख्य आरोपी आहेत. कारण त्यांच्याच परळीतील कार्यालयात बैठक झालेली आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराड हा माझाच माणूस आहे, असे धनंजय मुंडे छातीठोकपणे सांगतात, असेही मनोज जरांगे म्हणाले.
सीडीआर मिळताच ते पब्लीश करणार
दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या सीडीआरची मागणी केली आहे. “सीडीआरच्या मदतीने कोण-कोण सहआरोपी होऊ शकतं स्पष्ट होणार आहे. मला हे सीडीआर लवकरच मिळणार आहेत. सीडीआर मिळताच मी ते पब्लीश करणार आहे. संतोष देशमुख यांचा खून करण्याआधी, खून करण्याच्या नंतर अनेक लोकांनी सहकार्य केलं आहे. आरोपींना फोन पेच्या माध्यमातून कोणी पैसे पाठवले? आरोपींना फरार होण्यास कोणी मदत केली? हे जनतेला समजले पाहिजे, अशीही मागणी मी केली आहे,” असे संतोष देशमुख यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांना मुख आरोपी करा, अशी मागणी केल्यामुळे पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.