Marathwada Weather: मराठवाड्यात हवामानाचा चकव्याचा खेळ, 8 दिवसात पारा 40 वरून 30 पर्यंत, काय आहे अंदाज?
20 मार्चनंतर तापमान झपाट्यानं कमी होत गेलं. अर्थात दिवसा काही प्रमाणात गर्मी जाणवत असली तरीही उन्हाळ्याची तीव्रता मागील तीन दिवसात कमी झाली आहे. त्यामुळे ऊन्हाळी साहित्य विक्रेत्यांपासून बच्चे कंपनीचाही हिरमोड झालाय.
औरंगाबादः मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू लागला. तापमानाचा (Temperature) पारा 40 अंशांवर पोहोचल्यामुळे यंदा उन्हाळा किती रखरखीत असेल, असे अंदाज बांधले जाऊ लागले. उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) मराठवाड्यातील सर्वच शहरांचे तापमान वाढले होते. मात्र रविवारपासूनच तापमानाचा पारा झपाट्याने खाली सरकायला सुरुवात झाली. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातच हे चित्र पहायला मिळाले. सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस वातावरण ढगाळ (Cloudy weather) राहिले. परिणामी औरंगाबादचे तापमान 30 अंशांपर्यंत पोहोचले. मराठवाड्यातील औरंगादसह जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाद, लातूरह आदी सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात घट झाली. ऊन आणि ढगाळ वातावरणाच्या या सतत बदलत्या चित्रामुळे काहीशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अंदामान बेटांवर असानी चक्रीवादळ दाखल झालं आहे. या भागात सोसाट्याचा वारा सुटला असून त्याचा फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना बसत आहे.
महत्त्वाच्या शहरांचे तापमान
भारतीय हवामान विभागाच्या वेबसाइटनुसार, मराठवाड्यातील प्रमुख चार जिल्ह्यांचे किमान आणि कमाल तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. या दोन्ही तापमानात खूप जास्त तफावत आहे. त्यावरून हवामानात किती अस्थिरता आहे, हे दिसून येते.
औरंगाबाद- कमाल 38 अंश सेल्सियस- किमान 24 अंश सेल्सियस नांदेड- कमाल 40 अंश सेल्सियस- किमान 23 अंश सेल्सियस उस्मानाबाद- कमाल 39 अंश सेल्सियस- किमान 21 अंश सेल्सियस परभणी- कमाल 40अंश सेल्सियस- किमान 25अंश सेल्सियस
काय आहे हवामानाचा अंदाज?
IMD च्या वेबसाइटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवेल. एकूण वातावरण ढगाळ राहिल. आज महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये अंशतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसानंतर मराठवाड्यातील हवामान पुन्हा कोरडे होईल आणि तापमानात हळू हळू वाढ होण्यास सुरुवात होईल.
Latest satellite obs at 9 am of 22 Mar, indicates scattered clouds ovr almost entire Maharashtra, except over parts of Vidarbha. Thunder clouds(dark) observed ovr parts of Konkan including Mumbai,Thane Raigad Rtn Pune, Kol Slp Watch for IMD updates Interior too parches of TS clouds pic.twitter.com/ydQIuVaIki
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 22, 2022
उन्हाळ्याचा उत्साह तूर्तास मावळला
मागील आठवड्यात 13 मार्च ते 19 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच मराठवाड्यातही उष्णतेची लाट आली होती. सकाळी 9 वाजेपासूनच तापमानाचा पारा चढलेला दिसून येत होता. त्यामुळे बाजारात लाल माठ, काळे माठ, तसेच पांढऱ्यावर नक्षीकाम केलेले माठ विक्रेत्यांची लगबग सुरु झाली होती. यावर्षी उन्हाळा लवकर सुरु झाल्यामुळे माठांचा व्यवसाय जोरात चालेल, अशी आशा या विक्रेत्यांना वाटू लागली होती. तसेच उन्हाळी फळे टरबूज, खरबूज, द्राक्षांचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली. बच्चे कंपनीनेही ऊसाचा रस, आइसक्रीम पेप्सीची मजा घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर पुढच्याच आठवड्यात वातावरणात कमालीचा बदल जाणवू लागला. 20 मार्चनंतर तापमान झपाट्यानं कमी होत गेलं. अर्थात दिवसा काही प्रमाणात गर्मी जाणवत असली तरीही उन्हाळ्याची तीव्रता मागील तीन दिवसात कमी झाली आहे. त्यामुळे ऊन्हाळी साहित्य विक्रेत्यांपासून बच्चे कंपनीचाही हिरमोड झालाय.
इतर बातम्या-