कर्णबधिर मुलांचा या सरकारला शाप लागेल, राज ठाकरे संतापले!
पुणे : न्याय्य मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांवर पुणे पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक मुलं गंभीररित्या जखमी झाली. यावेळी पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले कार्यक्रम बाजूला सारुन तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकून, त्यांना जाहीर पाठिंबा दिला. “कर्णबधिर मुलांचा या सरकारला शाप लागेल”, असे म्हणत […]
पुणे : न्याय्य मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांवर पुणे पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. यात अनेक मुलं गंभीररित्या जखमी झाली. यावेळी पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले कार्यक्रम बाजूला सारुन तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकून, त्यांना जाहीर पाठिंबा दिला. “कर्णबधिर मुलांचा या सरकारला शाप लागेल”, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“कर्णबधिर आंदोलकांवरा लाठीहल्ला हा केवळ पोलिसांचा विषय नाही. ज्याने लाठीहल्ल्याचे आदेश दिले, त्याचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे. काय त्या मुलांच्या मागण्या चुकीच्या आहेत का? त्यांना शिकायचं आहे आणि त्यासाठी साईन लँग्वेज शिक्षकाची गरज आहे. कर्णबधिर मुलांचे या सरकारला शाप लागेल.”, असे राज ठाकरे म्हणाले.
अधिकारी जर मुलांचे ऐकत नसतील, तर या सरकारचा काय उपयोग?, असे म्हणत राज ठाकरे यांनी हतबलतही व्यक्त केली. मात्र, मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न करणार, असे आश्वासनही राज ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच, आंदोलकांची सर्व व्यवस्था आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना करायला सांगितली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे पोलिसांचा अमानुषपणा
पुण्यात न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधिर आणि कर्णबधिरांच्या शांततेत होणाऱ्या मोर्चावर पुणे पोलिसांनी अत्यंत हिंस्रपणे आणि अमानुषपणे लाठीहल्ला केला. कर्णबधिरांकडून पुण्यातील समाज कल्याण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांकडून हा मोर्चा अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्जला सुरुवात केली. शिवाय 60 ते 70 तरुणांना ताब्यातही घेण्यात आले.
पुण्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हे मूकबधिर तरुण आणि तरुणी त्यांच्या मागण्या मांडणार होते. त्यानंतर मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं पत्र दिलं जाणार होतं. त्याअगोदरच पोलिसांनी अडवणूक करत या दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्च केला. या मारहाणीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.
आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा करत होतो, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केलाय. दिव्यांगांना पोलिसांकडून मारहाण केली जाऊ शकत नाही, तरीही पोलिसांनीच कायदा हातात घेत मारहाण केल्याचा आरोप दिव्यांगांनी केलाय. मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन विविध ठिकाणी ठेवण्यात आलंय.
मागण्या काय आहेत?
- शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मूक बधिरांच्या अनुशेष भरतीचा फेर आढावा घेवून पद भरती करण्यात यावी.
- दिव्यांगासाठी मोफत घरकुल देण्यात यावे.
- कर्ज योजना आणि बँकांकडून होणारी दिव्यांगाची अडवणूक थांबविण्यात यावी.
- मूक बधिरांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड देण्यात यावे.
- संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करून ते एक हजार रुपये करून मूक बधीर कुटुंब प्रमुखास दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा यासह इतर मागण्या.