MPSC : समांतर आरक्षणामुळे नियुक्ती रद्द, 118 उमेदवारांना थेट नोकरी
या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती (MPSC assistant motor vehicle inspector) देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून निवड होऊनही समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट क) पदावरील 118 उमेदवारांना (MPSC assistant motor vehicle inspector) परिवहन विभागाने मोठा दिलासा दिलाय. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती (MPSC assistant motor vehicle inspector) देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
एमपीएससीकडून सहायक मोटार वाहन निरिक्षक (गट क) पदासाठी परीक्षा घेण्यात आली. 31 मार्च, 2018 रोजी एमपीएससीने या पदासाठी 832 उमेदवारांची सरकारला शिफारस केली. पण या काळात सामान्य प्रशासन विभागाच्या 19 डिसेंबर, 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी आणि समांतर आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 08 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आयोगाने सुधारित निकाल जाहीर केला. या निकालानुसार आयोगाने 11 सप्टेंबर, 2019 रोजी नव्याने 118 उमेदवारांची सरकारकडे शिफारस केली. त्याचवेळी आधीच्या निकालातील 118 उमेदवारांना यादीमधून वगळण्यात आलं.
परीक्षेत पास होऊनही या 118 उमेदवारांची नियुक्ती रद्द झाली होती. 11 सप्टेंबर, 2019 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सरकारकडे शिफारस केलेल्या सर्व 832 उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील, अशी माहिती दिवाकर रावतेंनी दिली.याशिवाय या यादीमधून वगळण्यात आलेल्या 118 उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येईल.
न्यायालयाच्या निर्णयास अनुसरुन आणि नियमानुसार तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्यात येणार असल्याचं रावते आणि चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. गेली काही वर्षे हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांना वगळणे योग्य होणार नाही, अशी सरकारची भावना आहे. त्यामुळे सरकार प्रथमच अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेत आहे, असंही रावते म्हणाले.