निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींची नवी खेळी, फाशीविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya rape case) दोषींकडून वारंवार फाशीच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न होत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फाशीला स्थगिती देण्यासाठी नवी खेळी केली आहे.
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya rape case) दोषींकडून वारंवार फाशीच्या अंमलबजावणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न होत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फाशीला स्थगिती देण्यासाठी नवी खेळी केली आहे. त्याचाच भाग म्हणून दोषींच्या वकिलांनी या फाशीला स्थगिती देण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज केला आहे (Nirbhaya rape case).
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 20 मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. मात्र दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र पाठवत फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याशिवाय भारतीय न्यायालयांनी याप्रकरणातील सर्व कागदपत्रे द्यावे, जेणेकरुन आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा मुद्दा सविस्तर मांडता येईल, अशीदेखील मागणी दोषींच्या वकिलांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत, असंदेखील ए. पी. सिंह म्हणाले आहेत. पवनचं वय 16.5 वर्ष होतं म्हणजे तो त्यावेळी अल्पवयीन होता. तसे कागदपत्रही आहेत. मात्र, त्या कागदपत्रांना गृहित का धरलं जात नाही? याप्रकरणातील सर्व कागदपत्रे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मागवली पाहिजेत आणि त्यावर तातडीने सुनावणी झाली पाहिजे, असं दोषींचे वकील ए. पी. सिंह म्हणाले.
दोषी मुकेशची याचिका फेटाळली
याशिवाय या प्रकरणातील दुसरा आरोपी मुकेश सिंहने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेशने आपले पहिले वकीलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळली. मुकेशची बाजू मांडणाऱ्या वकील वृंदा ग्रोवर यांनी त्याच्या विरोधात षडयंत्र रचून धोका दिल्याचा आरोप त्याने केला होता. त्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
निर्भया बलात्कार प्रकरण
16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकुर यांना 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे.