Pune Water Supply | पुण्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा, गणेशोत्सवापर्यंत पाणी कपात नाही : महापौर
"गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही," असा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला (Pune No Water Supply Cut till Ganeshotsav) आहे.

पुणे : “गणेशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही,” असा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज (4 ऑगस्ट) महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Pune No Water Supply Cut till Ganeshotsav)
पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत पालिकेतील बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त आणि जलसिंचन विभागाच्या अधिकारी उपस्थितीत होते. या बैठकीत पुण्यात नेमका किती टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे जिल्ह्याला पाणी किती द्यायचे आहे, तसेच नेमकं पिण्यासाठी किती पाणी उपलब्ध आहे, याबाबत चर्चा झाली.
“गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे सदस्थितीत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गणोशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात केली जाणार नाही,” अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
“पुणे शहराला टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्यावर्षी आजच्या तारखेला या धरणात जवळपास 97 टक्के म्हणजेच 28 टीएमसी एवढा पाणीसाठा होता. मात्र यंदा पुणे, मुंबईत पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या धरणात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 15 ऑगस्टपर्यंत शहरात तसेच जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुण्यात जवळपास 104 टक्के पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता गणोशोत्सव होईपर्यंत पुण्यात पाणी कपात नाही, असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले.
मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात
दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रात उद्या 5 ऑगस्टपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. कमी पावसामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
यंदा पावसाळ्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात 85.68 टक्के आणि 2018 च्या जुलैमध्ये 83.30 टक्के जलसाठा होता. (Pune No Water Supply Cut till Ganeshotsav)
संबंधित बातम्या :