स्थानिक पातळीवर काँग्रेस नाही, बिहारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जागांवर लढल्याने पराभव : पी चिदंबरम
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे (P Chidambaram on Bihar election result).
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक आणि आठ राज्यांमधील पोटनिवडणुकांनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, तारिक अन्वर यांच्या पाठोपाठ आता पी. चिदंबरम यांनीदेखील काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. चिदंबर यांनी ‘दैनिक भास्कर’ या हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसला बिहारमध्ये आलेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली (P Chidambaram on Bihar election result).
“बिहार विधानसभा निवडणूक आणि आठ राज्यांमधील पोटनिवडणुकीच्या निकालावरुन काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर कुठेच कार्यरत नाही हे दिसतं. याशिवाय बिहारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यापेक्षा कमी जागांवर निवडणूक लढायला हवी होती”, अशी रोखठोक भूमिका चिदंबरम यांनी मांडली.
“बिहार निवडणुकीपेक्षा पोटनिवडणुकीच्या निकालांमुळे जास्त वाईट वाटत आहे. पोटनिवडणुकीचा निकालावरुन स्थानिक पातळीवर पक्ष किती मजबूत आहे ते सिद्ध होतं. बिहारमध्ये तर विजयाच्या इतक्या जवळ असूनही पराभवाचा सामना कारावा लागला, याबाबत विचार करायला हवा”, असं चिदंबरम यांनी सांगितलं.
“काँग्रेसने बिहारमध्ये खरंतर फक्त 45 जागांवर निवडणूक लढवायला हवी होती. काँग्रेस ज्या जागांवर लढली त्यापैकी 25 जागांवर गेल्या 20 वर्षांपासून भाजप किंवा त्यांचे सहकारी पक्षांची सत्ता आहे”, अशी प्रतिक्रिया चिदंबरम यांनी दिली (P Chidambaram on Bihar election result).
लोकांना आमच्याकडून आशा उरल्या नाहीत : सिब्बल
दरम्यान, पी चिदंबरम यांच्या आधी कपिल सिब्बल यांनीदेखील काँग्रेसच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. “अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही”, असे मत कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली होती. “या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे”, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली होती.
काँग्रेस नेत्यांचा ‘लेटर बॉम्ब’
यापूर्वी कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतर कपिल सिब्बल आणि इतर नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया, जानेवारीत काँग्रेसला मिळणार पूर्णवेळ अध्यक्ष