मुबंई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा पोलीस मुंबईत दाखल झाले. सुशांतचे वडील के के सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियाने सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपये गहाळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस सुशांतच्या कंपनीचं बँक खातं असलेल्या वांद्रे येथील कोटक महिंद्रा बँकेत दाखल झाले (Patna Police visit Mumbai Kotak Mahindra Bank to investigate Sushant bank account).
युरोपला गेल्यानंतर रियाने सुशांतच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढले, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर पाटणा पोलीस तपास करत आहेत. पाटणा पोलिसांनी कोटक महिंद्रा बँकेत सुशांतच्या कंपनीच्या बँक खात्याबाबत चौकशी केली. यावेळी मुंबई पोलिसांनी चांगलं सहकार्य केल्याची माहिती पाटणा पोलिसांकडून देण्यात आली आहे (Patna Police visit Mumbai Kotak Mahindra Bank to investigate Sushant bank account).
सुशांतच्या रियालीटीएक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपणीचे खाते वांद्रे येथील कोटक महिंद्रा बँकेत आहे. बिहार पोलिसांनी बँक मॅनेजरकडून 2018 ते 2020 दरम्यानच्या सर्व व्यवहाराची माहीती घेतली. पोलिसांनी जवळपास 2 तास बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
हेही वाचा : रियाने सुशांतला खूप त्रास दिला, अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब, व्हॉट्सअॅप चॅटचा दाखला
सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
तपास सीबीआयला देण्याची गरज नाही, गृहराज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून योग्य पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे हा तपास सीबीआयला देण्याची गरज नाही”, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. “याप्रकरणाचा तपास कुठल्याही परिस्थितीत सीबीआयला देणार नाही. ज्यांचे जबाब नोंदवण्याचे आहेत, त्याची प्रक्रिया सुरु आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
हेही वाचा : रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती
रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत
सुशांतचे वडील के के सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर रियाने वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी केली होती. मुंबईतील सांताक्रुझमध्ये असलेल्या रियाच्या घरी बिहार पोलिस जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे रियाने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनाची तजवीज केली.
रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत केस बिहारहून मुंबईत ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. तर सुशांतच्या वडिलांनी रियाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेविरोधात अर्ज केला आहे. रियाच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आधीपासूनच शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सलमान खान, संजय दत्त यांच्यासारख्या कलाकारांची बाजू लढवणारे ख्यातनाम वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाचे वकीलपत्र घेतले आहे.
अंकिता लोखंडेचा धक्कादायक जबाब
सुशांतची गर्लफ्रेंड रिया ही त्याला खूप त्रास द्यायची, याबाबत सुशांतने स्वत: आपल्याला सांगितलं होतं, असं अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने बिहार पोलिसांना सांगितलं. बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सुशांतने आपल्याला फोन केला होता. यावेळी त्याने माझं अभिनंदन केलं. त्यानंतर तो रियाबद्दल बोलत होता. रिया मला खूप त्रास देते. तिच्यासोबत रिलेशनमध्ये मला रहायचं नाही. मला तिच्यापासून दूर व्हायचं आहे. मला काही सुचत नाही, असं सुशांतच म्हणणं होतं”, अशी माहिती अंकिताने पोलिसांना दिली.
सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.
संबंधित बातम्या :
सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत
Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा