मोदींचा ‘ग्लोबल’ डंका; बलाढ्य नेत्यांना धोबीपछाड, जागतिक क्रमवारीत वरचं स्थान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी यांनी 8 व्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या क्रमवारीत चार स्थानांची घसरण नोंदविली गेली आहे.
नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर लोकप्रियता कायम ठेवली आहे. पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या (World’s Most Admired Men list of 2021) यादीत स्थान पटकावित लोकप्रियता सिद्ध केली आहे. जागतिक स्तरावरील संशोधन कंपनी YouGov द्वारे क्रमवारी घोषित करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना मागे टाकत पंतप्रधान मोदी यांनी जागतिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत 8 व्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या क्रमवारीत चार स्थानांची घसरण नोंदविली गेली आहे. विविध मापदंडाच्या आधारावर ब्रिटिश मार्केट संशोधन कंपनी YouGov दरवर्षी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांची (World’s Most Admired Men list of 2021) यादी घोषित करते. यंदा प्रकाशित करण्यात आलेल्या यादीत पंतप्रधान मोंदीसोबत जागतिक स्तरावरील अन्य प्रभावशाली व्यक्तींचा देखील समावेश आहे.
प्रशंसनीय पुरुषांत तेंडुलकर अन् कोहली!
क्रमवारीच्या शीर्ष 20 स्थानांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याव्यतिरिक्त अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या नावांचा देखील समावेश आहे.
ओबामा ‘टॉप’ जागतिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती बिल गेट्स यांनी स्थान पटकाविले आहे. जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून यादी अंतिम करण्यात आली. तब्बल 38 देशांतील 42000 नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदविला.
जगातील दहा प्रशंसनीय पुरुष: बराक ओबामा बिल गेट्स शी जिनपिंग क्रिस्टियानो रोनाल्डो जॅकी चैन एलन मस्क लियोनल मेस्सी नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतिन जैक मा
पंतप्रधानांची घौडदोड
यावर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेची संशोधन कंपनी मॉर्निंग कन्सल्टद्वारे जारी करण्यात आलेल्या जागतिक मान्यताप्राप्त नेत्यांच्या यादीत शीर्ष स्थान प्राप्त केले होते. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना 70 टक्के नागरिकांनी पहिल्या क्रमांकाची पसंती दर्शविली होती.