कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश
आपल्यासाठी कोरोना लशीच्या वेगवान वितरणाबरोबरच लोकांचा जीव वाचवणेही महत्त्वाचे आहे. | PM Narendra Modi
नवी दिल्ली: आगामी काळात कोरोना लशीच्या (Covid Vaccine) वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. कोरोना लशीच्या वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लशीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे. त्यासाठी राज्यांनी कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच पुढाकार घेऊन काम करायला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (PM Narendra Modi on Covid Vaccine distribution strategy in India)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यानंतर त्यांनी आपल्या भाषणात कोरोना लशीच्या वितरणाबाबत राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कोरोना लशीच्या वितरणासाठी आपल्याला आतापासूनच कामाला लागले पाहिजे. त्यासाठी राज्यांनी प्रादेशिक स्तरावर स्टेअरिंग कमिटीपासून बुथ स्तरापर्यंत यंत्रणा उभारायला हवी. राज्यांनी या सगळ्याचा तपशील केंद्र सरकारकडे पाठवावा. कोरोना लशीच्या उपलब्धतेविषयी केंद्रांकडून राज्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
There is also a focus on making oxygen and ventilators available. We are trying to make the medical colleges and district hospitals self-sufficient in oxygen generation. Efforts underway to establish more than 160 oxygen generation plants in the country: PM Modi pic.twitter.com/0Oudeo9tQr
— ANI (@ANI) November 24, 2020
आपल्यासाठी कोरोना लशीच्या वेगवान वितरणाबरोबरच लोकांचा जीव वाचवणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे लस 100 टक्के सुरक्षित आहे, हे शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर ती भारतीयांना देण्यात येईल. राज्यांच्या सहकार्याने कोरोना लशीचे वितरण केले जाईल. त्यामुळे राज्यांनी कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उभारण्यासाठी कामाला लागावे, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. कोरोनाची लस येणार असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या लढाईत कोणतीही ढिलाई बाळगू नये, असेही मोदींनी सांगितले.
‘कोरोनाची लस कधी येणार हे संशोधकांच्या हातात, राजकारण करू नका’
कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लस अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. ते सर्व संशोधकांच्या हातात आहे. पण त्यावरून कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
…अन् ‘त्या’ एका चुकीमुळे ऑक्सफर्डची लस अधिक परिणामकारक असल्याचा लागला शोध
भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….