गरोदर महिलांनी रंगपंचमीमध्ये ‘हा’ मोह टाळावा… अशी घ्या स्वतःची काळजी
कोरोनाच्या काळात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. होळीमध्ये लहान मुले, वृद्धांव्यतिरिक्त गरोदर महिलांनी स्वतःची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. होळीच्या सणात गरोदर महिलांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मुंबई : रंगपंचमी (Holi) हा सण मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा केला जात असतो. यंदा 17 व 18 मार्चला अनुक्रमे होळी व रंगपंचमी साजरी केली जात आहे. लोक काही दिवस आधीपासूनच होळीची तयारी करत आहेत. रंगपंचमी म्हटलं की, मौज, मजा, उत्साह अन् आनंदाला पारावार नसतो. या उत्सवात लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटून एकमेकांना रंग लावतात, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ चाखतात. रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाच्या काळात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. होळीमध्ये लहान मुले, वृद्धांव्यतिरिक्त गरोदर महिलांनी (Pregnant women) स्वतःची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. होळीच्या सणात गरोदर महिलांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही गर्भवती असाल आणि तुम्हाला होळी खेळायची असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी (take care) घेणे गरजेचे ठरते. जेणेकरुन तुम्ही आणि तुमच्या पोटातील बाळ सुरक्षित राहील.
नाचण्याचा मोह टाळा
रंगपंचमीचा सण हा मौजमजा अन् उत्साहाचा सण आहे. त्या वेळी नाचणे आणि गाणे हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत रंगपंचमीच्या दिवशी लोक डीजे किंवा मोठ्या आवाजात गाणे लावून नाचतात. पण तुम्ही गरोदर असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही महिला गर्भवती असेल तर तिने नाचणे टाळावे. एवढेच नाही तर इतर लोक ज्या ठिकाणी नाचत असतील त्या ठिकाणापासून दूर राहा. कारण डोलताना, नाचताना अनेकवेळा ढकलले जाण्याची तसेच कुणाचाही हात पोटाला लागण्याची भीतीही असते.
कोरडी रंगपंचमी खेळा
रंगपंचमी हा साहजिकच रंगांचा सणउत्सव आहे. लोक कोरडी रंगपंचमी अबीर गुलालाने खेळतात, तर अनेकजण पाण्याने ओली रंगपंचमीही खेळतात. मात्र गरोदर महिलांनी पाण्याने रंगपंचमी खेळणे टाळावे. कारण जर तुम्ही पाण्याने रंगपंचमी खेळत असाल तर सगळीकडे पाणीच पाणी असू शकते आणि त्यातून पाय घसरण्याची भीती असते.
हर्बल रंग वापरा
कोरडी रंगपंचमी खेळत असलो तरी वापरत असलेल्या रंगांवर विशेष लक्ष द्यावे. अनेक रंग रसायने वापरून तयार केले जातात जे तुमच्या त्वचेसाठी तर वाईटच असतात, पण त्यामुळे अॅलर्जीचा धोकाही असू शकतो. त्यामुळे रंगपंचमीमध्ये हर्बल रंगांचा वापर करावा. गर्भवती महिलांची त्वचा अतिशय संवेदनशील बनते, रसायने त्यांना हानी पोहोचवू शकतात.
गर्दी टाळा
कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक अंतरदेखील आवश्यक आहे. रंगपंचमी दरम्यान कमी लोकांच्या संपर्कात यावे, गर्भवती महिलांनी गर्दीपासून दूर राहावे आणि लोकांना भेटताना मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतराचे पालन करावे.
इतर बातम्या