पुलवामा हल्ला : भारत पुन्हा एकदा घरात घुसून मारणार?
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 42 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. उरी हल्ल्यानंतर […]
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 42 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारलं होतं. आता पुन्हा एकदा मोदी सरकार पाकिस्तानला धडा शिकवणार असल्याचं बोललं जातंय.
पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रत्येकाचं रक्त खवळलंय. प्रत्येक जण बदला घेण्याची मागणी करत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थेट इशारा दिलाय. आमच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पाकिस्तानला या हल्ल्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचं भाजपने म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे सुरक्षेवरील कॅबिनेट कमिटीची शुक्रवाऱी सकाळी बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
सर्जिकल स्ट्राईकचं यशस्वी नियोजन करणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभालही सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अधिकाऱ्यांकडून या संबंधित प्रत्येक माहिती घेतली जात आहे. अजित डोभाल यांनी सर्जिकल स्ट्राईकचा प्लॅन एवढा गुप्तपणे केला होता, की दुसऱ्या दिवशी जेव्हा भारतीय जवान दहशतवाद्यांचा खात्मा करुन पुन्हा भारताच्या सीमेत आले, त्यानंतर सैन्याकडून ही माहिती देण्यात आली होती.
भाजपकडूनही या हल्ल्यावर कठोर शब्दात प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पाकिस्तानने भारताच्या सरकारला ललकारलंय. त्यांची भविष्यात काय परिस्थिती होईल याचा त्यांना अंदाज नाही. पाकिस्तानला मागच्या वेळी सर्जिकल स्ट्राईकने धडा शिकवला होता. दहशतवाद्यांचा तेव्हा खात्मा केला होता, असं भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलंय.
उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला
18 सप्टेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी उरीमध्ये मोठा हल्ला केला होता. सैन्याच्या कॅम्पमध्ये झोपलेल्या सैनिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देश या हल्ल्याने हळहळला होता आणि प्रत्येकाच्या मनात बदला घेण्याचीच भावना होती. या हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला इशारा दिला होता. ज्यानंतर एका यशस्वी ऑपरेशनअंतर्गत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.
उरी हल्ल्यानंतर 28-29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याच्या विशेष पथकांनी ही मोहिम यशस्वी केली होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व जवान ही मोहिम यशस्वी करुन सुखरुपपणे माघारी परतले होते. 50 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तेव्हा करण्यात आला होता.