मुंबईः मुंबई पोलिसांविरोधात चांगली वागणूक मिळाली नसल्याचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची पुन्हा एकदा पोलखोल होण्याची शक्यता आहे. कारण या दोघांनाही सांताक्रूझ पोलीस ठाण्यातही चांगली वागणूक देण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज सांताक्रूझ पोलीस लवकरच जारी करणार असल्याचे समजते. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छळ केल्याचा गंभीर आरोप राणा दाम्पत्याकडून करण्यात आला होता. खार पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर पाणीही देण्यात आले नाही, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, कारण मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण चिघळले. ते थेट केंद्रापर्यंत पोहोचले. राणा यांनी याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी याचा अहवालही मागवला. राणा यांचा पोलीस कोठडीत असा कोणताही छळ झाला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते.
राणा प्रकरणाच्या वागणुकीमधील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून अखेर मुंबई पोलिसांनी एक व्हिडीओ जारी करून यातले सारे सत्य समोर आणले. ज्यात राणा यांना पोलीस ठाण्यात चहा पिताना, व्यवस्थित वागणूक मिळत असल्याचे दिसते आहे. मात्र, काही वेळात राणांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. हा व्हिडिओ हा राणा यांना खार पोलीस ठाण्यात आणले तेव्हाचा आहे. मात्र छळ हा सांताक्रुझ पोलिसांनी कोठडीत नेल्यानंतर रात्री दीड वाजल्यानंतर केला, असा दावा राणा यांच्या वकिलांकडून करण्यात आलाय.
Mumbai Police is expected to issue a CCTV footage from Santa Cruz Police Station after it found out that MP Navneet Rana, her husband Ravi Rana were treated well even at Santra Cruz PS, opposed to her ill-treatment allegations: Mumbai Police
— ANI (@ANI) April 27, 2022
आता मुंबई पोलिसांनी सांताक्रुझ कोठडीतील व्हिडीओ जारी करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. हा व्हिडीओ कधीही समोर येऊ शकतो. यापूर्वीची मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला कुठेही हीन आणि अपमानापस्पद वागणूक दिली नसल्याचा दावा केला आहे. आता या व्हिडीओमध्ये काय असेल, याची उत्सुकता लागली आहेच. त्यावर राणा दाम्पत्य आणि भाजप काय भूमिका घेणार हे ही पाहावे लागेल.