नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Health Ministry on Corona Virus) वाढत चालला आहे. कोरोनाचा सर्वनाश व्हावा यासाठी केंद्र सरकार सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने आज राज्यांना 3 हजार कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय केंद्र सरकारने याआधीदेखील राज्यांना 1100 कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य आणि गृह मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी गृह आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रलाल यांनी याबाबत माहिती दिली (Health Ministry on Corona Virus).
“देशात 24 तासांत कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4067 वर पोहोचला आहे. यापैकी 1,445 रुग्ण तब्लिगींशी संबंधित आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 76% पुरुष तर 24% महिला आहेत”, अशी माहिती लव अग्रलाल यांनी दिली.
“कोरोनाने आतापर्यंत देशभरातील 109 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे काल (5 एप्रिल) देशभरात 30 जण दगावले. देशातील 63% कोरोनाबळी 60 पेक्षा अधिक वयाचे, तर 30% मृत 40 ते 60 वर्षे वयोगटातील असून 7% मयत हे 40 पेक्षा कमी वर्ष वयाचे होते”, अशीदेखील माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.
“लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. भारतीय रेल्वेने 13 दिवसांमध्ये 1340 मालवाहू गाड्यांच्या माध्यमातून साखर आणि 358 टँकरच्या माध्यमातून खाद्य तेल देशाच्या विविध कान्याकोपऱ्यात पोहोचवले आहे”, अशी माहिती लव अग्रलाल यांनी दिली.
“आतापर्यंत 16.94 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य देशभरात पाठवण्यात आलं आहे. देशातील 13 राज्यांमध्ये 1.3 लाख मॅट्रिक टन गहू आणि 8 राज्यांमध्ये 1.32 लाख मॅट्रिक टन तांदूळ पाठवण्यात आले आहेत”, असंदेखील लव अग्रलाल यांनी सांगितलं.
25000 तब्लिगींना क्वारंटाईन
तब्लिगी जमातच्या 25000 कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे तब्लिगी हरियाणा राज्यातील ज्या 5 गावांमध्ये गेले होते ती पाच गावंही सील करण्यात आली आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.
5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर
दरम्यान, कोरोनाविरोधात लढण्यासाठी 5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी 8-9 एप्रिलला 2.5 लाख किट डिलिव्हर होतील, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे रमन गंगाखेड यांनी दिली.