मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे काय म्हणाले?
"निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कोण कुठल्या जातीचा आहे? यापेक्षा हे राज्य 12 बलुतेदार आणि अठरापगड जनतेचं आहे", असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर मराठा समाजाचे उमेदवार देण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना दिला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर छत्रपती घराण्याचे कोल्हापूर घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर आपलं रोखठोक मत मांडलं आहे.
“सरकारने 10 टक्के आरक्षण दिले ते कसे टिकेल? हे सरकारने बघणे गरजेचे आहे. मनोज जरागे यांच्या मागणीत काही चुकीचे नाही. त्यांना भीती आहे, दोनदा मराठा आरक्षण हातातून गेलेलं आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण दिलं असेल तर ते कायद्यातच बसत नाही. मग या आरक्षणाचा अर्थ काय? आरक्षणाचा विषय चिघळायला नको. यासाठी मनोज जरांगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते यांनी मार्ग काढावा. सरकारचं म्हणणं आहे की, आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण टिकवन आमचे जबाबदारी आहे. आतापर्यंत काही झालं नाही जर टिकलं नाही तर याला जबाबदार कोण? याची दक्षता सरकारने घ्यावी”, अशी रोखठोक प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
‘निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं’
“निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कोण कुठल्या जातीचा आहे? यापेक्षा हे राज्य 12 बलुतेदार आणि अठरापगड जनतेचं आहे. आपल्या जातीवर प्रेम असणे यात काही चुकीचे नाही. पण कोण कुठल्या जातीचा आहे यावर याला पाडा त्याला निवडा हे म्हणणं चुकीचं आहे. सगळ्या बहुजनांना घेऊन पुढे जाणं हा माझा धर्म आहे. मराठा समाजासाठी माझा लढा आहे. कारण गरीब मराठ्यांना न्याय मिळाला नाही तो बाकीच्या इतर समाजाला मिळाला”, असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार
“350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्ष पूर्ततेचे हे वर्ष आहे. तेवढ्याच जोमाने उत्सव साजरा होण्यासाठी राज्यव्यापी बैठक घेतली. निवडणूक आचारसंहिता 10 जूनपर्यंत असल्याने थोडी अडचण आहे. पण राज्याभिषेक सोहळा दिमाखदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो. शिवराज्य अभिषेक सोहळा राष्ट्रीय उत्सव सारखा साजरा करावा यासाठी सरकारने लक्ष घालावे. मुख्यमंत्र्यांना एक-दोन दिवसात भेटणार आहे”, अशी देखील प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.