तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार घडेल; मराठा आरक्षणावरून कुणी दिला सरकारला मोठा इशारा
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.
मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. आझाद मैदानात येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. ते मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने काल लोणावळ्यात त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज नवी मुंबईतही त्यांच्याशी चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकाराल मोठा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.
शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. या मुद्यावर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे, असे ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते काय उपटत होते माहित नाही, त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे असा टोलाही त्यांनी लगावला.
या देशात संविधान राहिलेलं नाही
गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणी निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे. संविधान नाहीं हम करे सो कायदा असा खाक्या आहे. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.