सातारा जिल्हा बँक निवडणूक: सहकारमंत्र्यांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला, उदयनराजे भोसले यांचा भेटींचा सिलसिला यशस्वी होणार?
सहकार क्षेत्रात काम करताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद भाजपमध्ये गेलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे कायम ठेवलं.
सातारा: सहकार क्षेत्रात काम करताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद भाजपमध्ये गेलेले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे कायम ठेवलं. वारंवार लांबणीवर पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीपासून सर्वसमावेशक पॅनेलद्वारे निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार राष्ट्रवादीनं जिल्हा बँक निवडणुकीची जबाबदारी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर दिलीय. तर, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत देखील घेतलंय. या निवडणुकीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सध्या सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. सहकारमंत्र्यांचा थेट जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून येण्याचा निर्धार केलाय. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे गेली दोन टर्म जिल्हा बँकेत संचालक आहेत. गृहनिर्माण आणि दुग्ध विकास संस्था मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी त्यांना सर्वसमावेशक पॅनेलमध्ये संधी देणार का याकडं लक्ष लागलं आहे. उदयनराजे भोसले यांनी गेल्या दोन दिवसात मॅरेथॉन बैठकींचा सिलसिला सुरु ठेवलाय. सातारा जिल्ह्याच्या फलटण पासून ते कराडपर्यंत त्यांनी मॅरेथॉन भेटी घेतल्यानं अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काय राजकारण घडणार याकडं सातारकरांचं लक्ष लागलंय.
बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
राष्ट्रवादी काँग्रेस जरी सध्या जिल्हा बँक निवडणुकीसाठी सर्वसमावेशक पॅनेलचा मुद्दा लावून धरत असलं तरी मागील निवडणुकीचा इतिहास काही वेगळाच आहे. बँकेवर काही दिवस विलासकाका उंडाळकर यांचं वर्चस्व होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं विलासकाका उंडाळकार यांच्या विरोधात ताकद लावत जिल्हा बँकेत सत्ता प्रस्थापित केली. 2014 ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील राजकारण झपाट्यानं बदललं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील भाजपचा पर्याय स्वीकारला. शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्यानंतर ही त्यांची जिल्हा बँकेतील ताकद लक्षात घेता राष्ट्रवादीनं त्यांना हटवण्याची रिस्क घेतली नाही.
सहकारमंत्री थेट जिल्हा बँकेत पोहोचणार
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील जिल्हा बँकेत मानद संचालक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक लढवत थेट संचालक होण्याचा निर्णय घेतला. सहकारमंत्र्यांनी यावेळी कराड तालुक्यातून सोसायटी गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कराडमध्ये त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील यांचं कडवं आव्हान आहे. सहकारमंत्र्यांच्या जागेवर अजित पवार यांनी थेट उदयसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच तोडगा न निघाल्यानं अर्ज माघारीच्या दिवशी काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.बाळासाहेब पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये यापूर्वी गृहनिर्माण आणि दुग्धविकास संस्था गटातून लढत झाली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना पराभूत केलं होतं. आता बाळासाहेब पाटील स्वत: राज्याचे सहकारमंत्री आहेत. ते स्वत: जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत त्यामुळे एक प्रकारे बाळासाहेब पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उदयनराजे भोसले यांच्याकडून मॅरेथॉन भेटी
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार राष्ट्रवादीनं शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सोपवल्याची चर्चा सुरु आहे. उदयनराजे भोसले यांनी यानिमित्तानं सोमवारी विधानरपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, फलटण मधील इतर लोक प्रतिनिधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील आणि बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या भेटींमुळं उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी सर्वसमावेशक पॅनेलमध्ये संधी देणार का हे पाहावं लागणार आहे.
पक्ष म्हणून भाजपचं दुर्लक्ष?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी पक्षीय भूमिका स्पष्टपणे न मांडल्यानं या निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश येण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
इतर बातम्या:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास, दोन दिवसांत शस्त्रक्रियेची शक्यता
Satara District Co Operative Bank election Co operation Minister Balasaheb Patil and Udyanraje Bhonsales seat take attention of all state