पंकजा मुंडे यांच्याविरोधात ‘या’ महिला उमेदवाराचे नाव चर्चेत? बीडमध्ये शरद पवार यांचा मास्टरस्ट्रोक?
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा एकीकडे सुरु आहे. तर, दुसरीकडे दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांनी एक विशेष बैठक घेतली.
मुंबई | 18 मार्च 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघाचा दौरा करण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाने या मतदार संघावर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून लढविण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमदेवार कोण असेल याची उत्सुकता लागली आहे. अशातच पंकजा यांच्याविरोधात एका महिला नेत्याचे नाव पुढे आले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रणी नेते आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक होण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेणार दिवंगत नेते, आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव उमेदवारीसाठी आले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा एकीकडे सुरु आहे. तर, दुसरीकडे दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांनी एक विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधून निवडणूक लढवावी असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत सहभाग घेतला होता. 1995 मध्ये त्यांनी तत्कालिन भाजप शिवसेना युतीला पाठींबा दिला होता. युती सरकार आल्यावर मेटे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते. पण, पुढे युतीसोबत वाद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतर्फे 2 वेळा त्यांना आमदारकी मिळाली.
2014 च्या लोकसभा निवडणुक दरम्यान मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीत प्रवेश केला. याच काळात त्यांनी बीडमधून विधानसभाही लढविली होती पण ते पराभूत झाले. 2016 मध्ये त्यांना भाजपने विधानपरिषदेत पाठविले. याच काळात त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरु केले. या प्रश्नावरून त्यांनी सभागृहात रान पेटवले होते. मात्र, 2022 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
विनायक मेटे यांना भाजपने जरी आमदारकी दिली असली तरी त्यांना सतत डावलण्याचे कामही भाजपनेच केले असा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांनी बीड येथील बैठकीत केला. त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवावी असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला.
ज्योती मेटे काय निर्णय घेणार?
बीड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार) गटाने मागितली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे विरोधक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजितदादा गटासोबत गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही बहिण, भाऊ यांचे सूर पुन्हा जुळले असले तरी शरद पवार यांच्या रडारवर धनंजय मुंडे आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली शरद पवार गटाकडून होत आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं योगदान दिले आहे. त्यातच बीडमधील शिवसंग्राम भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे ज्योती मेटे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.