‘त्या’ शब्दावरून शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले, धार्मिक रंग…
Sharad Pawar On Devendra Fadnavis Statement : शरद पवारांनी 'त्या' विधानावरून उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवरही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचं भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बोललं जातं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे. असंच होतं. पण याचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला. फडणवीस यांनी तो शब्द वापरला, असं शरद पवार म्हणाले.
पवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा
मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरुंचे भाषण पुण्यात ऐकलं. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ४०० पारची. ४०० पार कशासाठी?, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर टीका केली आहे.
नरसिंहराव पंतप्रधान होते. आमची मेजॉरीटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हतं. तरीही सरकार चालवलं. सरकार चालतं. तरीही मोदी ४०० पार मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचं बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागलं की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असं पवार म्हणाले.
किती जागा जिंकणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतेय. अशातच कोणत्या आघाडीला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत तर्क लावले जात आहेत. याचबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर बघू किती जागा येतील, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? यावरही मी काही ज्योतिषी नाही, असं पवार म्हणाले.
फडणवीस यांचा पलटवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार पलटवार केला आहे. अतिशय खेदजनक आहे, अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष वोट जिहाद करत आहेत. सज्जाद नोमानी यांनी 17 मागण्या तीन पक्षांना दिल्या होत्या. या मागण्या भयानक आहेत. 10 टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या, 2012 ते 2024 मध्ये जेवढे महाराष्ट्रात दंगे झाले त्या दंग्यातील मुस्लिम आरोपींच्या केसेस मागे घ्या, संघावर बंदी घाला अशा 17 मागण्या दिल्या. या पक्षांनी पत्र देऊन त्या मागण्या मान्य करू असं सांगितलं आहे. आता सज्जाद नोमाणी हे वोट जिहाद करायला सांगत आहे. आमच्या वोट जिहादचे प्रमुख शरद पवार आहेत, असं ते सांगत आहेत. आमचे सिपसलार उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत आणि राहुल गांधी आहेत. निवडणुकीत इतकं लांगूलचालन या देशाच्या इतिहासात बघितलं नव्हतं. एक प्रकारे ध्रुवीकरण करण्यासाठी अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर सर्वांना एक व्हावंच लागेल. जर मूठभर मतांवर निवडून येऊ शकता वाटतं, तर मग बहुसंख्य मतांना एकत्र यावं लागेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.