बैलगाडा शर्यतीला ब्रेक राजकारण सुसाट, नेत्यांच्या सांगण्यावरून स्थगिती-आढळराव पाटील
703 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविल्याने शर्यतीचे श्रेय आढळराव पाटीलांना जाणार म्हणून कटकारस्थान करुन बैलगाडा शर्यत सुरू होण्याच्या आठ तास अगोदरच बैलगाडा शर्यतीची परवानगी रद्द केलाचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांचे नाव न घेता निशाणा साधलाय.
पुणे : बैलगाडा शर्यत आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळा सर्वांनी पहिला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर या बैलगाडा शर्यतीला राजकारणाची नजर लागली असून राजकीय श्रेयवादीची लढाई सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी आणि मावळ या दोन ठिकाणी पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली, मात्र राजकारण्यांच्या सांगण्यावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारातच बैलगाडा शर्यतीला स्थगिती करण्याचे पाप केले. असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी केलाय.
बैलगाडा शर्यतीवरून श्रेयवादाची लढाई
16 डिसेंबरला बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आणि पहिली शर्यत भरवण्यावरुन राजकारण सुरु झालं. अशातच आढळराव पाटीलांनी लांडेवाडी गावात शर्यती भरवल्या. राज्यभरातून 703 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविल्याने शर्यतीचे श्रेय आढळराव पाटीलांना जाणार म्हणून कटकारस्थान करुन बैलगाडा शर्यत सुरू होण्याच्या आठ तास अगोदरच बैलगाडा शर्यतीची परवानगी रद्द केलाचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांचे नाव न घेता निशाणा साधलाय. उत्तर पुणे जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खच्चीकरण केलं जातं आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे.
शेतकरी काय म्हणाले?
ग्रामीण भागात गावचा उत्सव, यात्रा असली की बैलगाडा शर्यत मोठ्या धुमधमाक्यात होतात. यातच बंदी उठल्या नंतर पुणे जिल्ह्यातील पहिली शर्यत ही आंबेगाव तालुक्यातील थापलिंग येथेच भरणार असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टाकळी हाजी येथील सभेत केलं होतं. मग आता शर्यतीच्या श्रेयासाठी या लांडेवाडी आणि मावळ येथील शर्यत स्थगित केल्या का? अशीही विचारणा आता सामान्य शेतकरी करीत आहेत. अचानक स्थगिती आल्याने शेतकरी सध्या नाराज आहेत.
कोरोना वाढल्याने शर्यतीला स्थगिती
सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनमुळे निर्बंध कडक करण्यात आलेत. त्याचे नागरिकांनी पालन करावे आणि ज्यावेळी निर्बंधांना शिथिलता मिळेल, त्याचवेळी बैलगाडा शर्यती भरतील असे सूचक विधान गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय. आधी न्यायालयाच्या चौकटीत अडकलेली बैलगाडा शर्यत आता महामारीच्या संकटात अडकली आहे. त्यातच राजकारण सुरू झालं आहे.