मॅड्रिड : स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा (Princess Maria Teresa) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मारिया टेरेसा 86 वर्षांच्या होत्या. स्पेनचे राजा फिलिप सहावे यांच्या त्या चुलत बहिण होत्या. मारिया (Princess Maria Teresa) यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बोरबोन यांनी फेसबुकवर राजकुमारीच्या निधनाची माहिती दिली. कोरोनामुळे राज घराण्यातील हा पहिला मृत्यू आहे.
राजकुमारी मारिया टेरेसा यांचा जन्म 28 जुलै 1933 रोजी झाला होता. त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॅड्रिडच्या विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं. मारिया त्यांच्या स्वतंत्र्य विचारसणीमुळे ओळखल्या जायच्या. रेड प्रिन्सेस अशा नावानेदेखील त्या प्रचलित होत्या. कोरोनामुळे 26 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (27 मार्च) मॅड्रिड येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. याआधी इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोनाने शिरकाव केल्याचं समोर आलं आहे. ब्रिटेनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये एकच खळबळ माजली आहे. दूसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
या पाठोपाठ आता स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचं कोरोनामुळे निधन झाल्याचं समोर आलं. कोरोनामुळे जगभरातील राज घराण्यातील हा पहिला मृत्यू आहे. दरम्यान, स्पेनचे राजा फिलिप सहावे यांचीदेखील तपासणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण नसल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. मात्र, एकदंरीत जगभरातील परिस्थती भीषण आहे.
जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 6 लाख 77 हजार 648 लोक बाधित झाले आहेत. यापैकी 31,737 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1 लाख 46 हजार 294 लोक बरे झाले आहेत. चीन पाठोपाठ कोरोनाने इटली, इराण, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, स्पेन यांसारख्या प्रगत देशांमध्ये हाहा:कार माजवला आहे. भारतातही कोरोना फोफावत चालला आहे.
संबंधित बातम्या :
आधी राजघराण्यात शिरकाव, आता थेट पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण, ब्रिटनचे पंतप्रधान कोरोनाग्रस्त