St worker strike : एसटी कर्मचाऱ्यांवर लवकरच मेस्मा लागणार? आजच्या कॅबिनेट बैठकीत काय चर्चा? वाचा सविस्तर
राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत, त्यामुळे राज्य सरकार सध्या कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
मुंबई : St कर्मचाऱ्यांवर लवकरच मेस्मा लावण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. कारण आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत, त्यामुळे राज्य सरकार सध्या कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मेस्मा लावण्याबाबत राज्य सरकार सध्या कायदेशीर बाजू तपासून घेत आहे, लवकरच याबाबत परिवहन खाते निर्णय घेण्याची शक्याता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची, कारवाईची सविस्तर माहिती
एसटी महामंडळातील आज 21 हजार 873 कर्मचारी कामावर हजर आहेत. प्रत्यक्ष संपात 67 हजार 675 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. संपूर्ण राज्यभरात 122 आगार चालू आहेत. तर 128 आगार बंद आहेत. एसटी महामंडळातून आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकी करता 2718 फेऱ्यांद्वारे वाहतूक करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आज 11 एसटी कर्मचार्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आज 27 एसटी कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे. आत्ता पर्यंत एकूण 257 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
निलंबित आणि सेवासमाप्तीची कारवाई केलेली संख्या मोठी
आज एसटी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली संख्या ५२ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत एकूण 2 हजार 624 एसटी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 111 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण 10 हजार 481 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आज दोन एसटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 2 हजार 43 एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.