“रणबीर कपूर हैदराबादला होणार शिफ्ट”; मंत्र्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-रिलिज कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला. यावेळी तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी असं वक्तव्य केलंय, ज्याची जोरदार चर्चा होत आहे. वाचा नेमकं काय घडलं..
हैदराबाद : 28 नोव्हेंबर 2023 | रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ॲनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यांमध्ये या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. नुकताच हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्री-रिलीजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रणबीरसोबतच साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौलीसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात तेलंगणाचे कामगार आणि रोजगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी भाषण दिलं आणि यावेळी त्यांनी असं काही वक्तव्य केलं, ज्याची आता सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. रेड्डी म्हणाले की पुढील पाच वर्षांत तेलुगू लोक भारत, बॉलिवूड आणि हॉलिवूडवरही राज्य करतील. इतकंच नव्हे तर रणबीर कपूर पुढच्या वर्षी हैदराबादला शिफ्ट होणार, असंही ते म्हणाले.
मंत्री मल्ला रेड्डी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ते मंचावर अत्यंत जोषाने वक्तव्य करताना दिसत आहेत. “रणबीरजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. येत्या पाच वर्षांत आमचे तेलुगू लोक संपूर्ण भारतात, बॉलिवूड आणि हॉलिवूडवर राज्य करतील.” हे ऐकल्यानंतर महेश बाबू आणि रणबीर कपूर हसू लागतात. त्यापुढे मंत्री रेड्डी म्हणतात, “रणबीरजी, तुम्हीसुद्धा वर्षभरात हैदराबादला शिफ्ट व्हाल. तुम्ही म्हणाल की बॉम्बे जुनं झालं आहे, बेंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम आहे. भारतात फक्त एकच शहर आहे आणि ते म्हणजे हैदराबाद.”
पहा व्हिडीओ
Yesterday Malla Reddy a politician made inappropriate remarks about Bollywood
But Some Hakla fans are wrongly blaming Tollywood & #Prabhas
North audience plz don’t take the politician words seriously it doesn’t represent the entire industry.#MaheshBabupic.twitter.com/THYGEoSNcY
— Narendra Modi (Parody) (@NarendramodiPa) November 28, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरडी अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘राजकीय नेते मल्ला रेड्डी यांनी बॉलिवूडबद्दल अनुचित टिप्पणी केली. मात्र काही प्रशंसक हे टॉलिवूड आणि प्रभास यांच्यावर चुकीचा आरोप करत आहेत. उत्तरेच्या प्रेक्षकांनी कृपया राजकारण्यांच्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहू नये. ते संपूर्ण इंडस्ट्रीचं प्रतिनिधीत्व करत नाहीत.’
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे आपल्याच वेगळ्या विश्वात राहतात. त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘रणबीरच्या संयमाचं कौतुक केलं पाहिजे’, अशी उपरोधित टिप्पणी दुसऱ्या युजरने केली. दरम्यान रणबीर आणि रश्मिकाचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणबीर आणि रश्मिकाशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.