श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी बुधवारी (18 नोव्हेंबर) पोलीस आणि सीआरपीएफ जवांनाच्या संयुक्त टीमवर ग्रेनेडचा हल्ला केला. मात्र, अतिरेक्यांचा निशाणा चुकल्याने पोलीस आणि जवान बचावले. ग्रेनेड रस्त्यावर जाऊन पडला. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत (Terrorist Grenade attack on Jawan).
पुलवामा जिल्ह्यातील काकापुरा चौकात ही घटना घडली. या चौकात बाजार भरलेला होता. तिथे उपस्थित असलेल्या जवानांवर अतिरेक्यांनी ग्रेनेड फेकला. पण तो ग्रेनेड जवानांवर न पडता रस्त्यावर गर्दीत पडला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर बाजारातील लोकांची प्रचंड धावपळ सुरु झाली. अनेकांच्या ओरडण्याचा, रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. लोक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाला पळू लागले.
सुरक्षादलांनी तातडीने बाजाराला चारही बाजूंनी घेरलं. मात्र, गदारोळाचा फायदा घेत दहशतवादी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या अतिरेक्यांना पकडण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन जारी केलं आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत 12 स्थानिक नागरिक जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुलवामा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जखमींमध्ये एक नागरिक उत्तर प्रदेशचा आहे. पण तो गेल्या काही वर्षांपासून पुलवामात दुकान चालवतो. इतर जखमी नागरिक तेथील स्थानिक आहेत (Terrorist Grenade attack on Jawan).
जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून होणाऱ्या ग्रेनेड हल्ल्याची संख्या वाढली आहे. याआधी सोमवारी (16 नोव्हेंबर) अतिरेक्यांनी कुलगाम येथील एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात कुणी पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली नव्हती.
#UPDATE | 12 civilians have been injured after terrorists lobbed a grenade in Kakapora, Pulwama: CRPF #JammuAndKashmir https://t.co/Kd0LKLkCJi
— ANI (@ANI) November 18, 2020
हेही वाचा :
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर सैफुल्लाहचा खात्मा