हाताला काम नाही, नोकरीच्या शोधात अन् अचानक गवसले सोन्याचे ब्रेसलेट, काय करावं तरुणानं?
कितीही भुरळ घालणाऱ्या गोष्टी दिसल्या तरी मानवी मनावर अस्सल संस्कार घडलेले असतील तर ते कोणत्याही स्थितीत साथ सोडत नाहीत. प्रामाणिकपणाचा संस्कार हा त्यातलाच. औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात प्रामाणिकपणाचा दाखला देणारी अशीच एक घटना घडली.
औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून हाताला काम नाही, नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणाला अचानक सोन्याचं ब्रेसलेट गवसलं तर तो काय करेल, यावर अनेकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतील. कुणाला लाकुडतोड्या आणि त्याच्या विहिरत पडलेल्या कुऱ्हाडीच्या गोष्टीची आठवण होईल. देवीनं विहिरीतून लाकुडतोड्याला सोन्याची, चांदीची कुऱ्हाड आणून दिली तरीही प्रामाणिक लाकूडतोड्यानं ज्याप्रमाणे इमानेइतबारे ती नाकारली, त्याचप्रमाणं या वास्तवातल्या घटनेतही बेरोजगार तरुणानं अत्यंत प्रामाणिकपणे त्याला सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकापर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे बाजारमूल्यानुसार, आज या ब्रेसलेटची किंमत तब्बल 1 लाख 10 हजार रुपये एवढी आहे.
सोयगाव तालुक्यातील प्रामाणिक महेशची कथा…
ही घटना घडलीय सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील पंचवीस वर्षीय तरुणाबाबत. झालं असं की, जळगाव येथील एक कापड मालक मिलिंद देव हे महिनाभरापूर्वी बनोटी येथे कार पाहण्यासाठी आले होते. गाडी बघून झाल्यावर ते पुन्हा जळगावात परतले. पण घरी गेल्यावर त्यांना हातातील ब्रेसलेट रस्त्यातच पडल्याचे कळले. ते ज्या मार्गाने बनोटी ते जळगावात आले, त्याच मार्गाने पुन्हा एकदा शोध घेतला, पण ब्रेसलेट काही सापडले नाही. त्यामुळे ते रिकाम्या हाताने, नाराज होऊन जळगावात परतले. इकडे बनोटी येथील गरीब शेतकरी शालीक खैरनार यांचा मुलगा महेश खैरनार हे मित्रासोबत शेतातून परतत होते. इतक्यात बनोटी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांना जमिनीवर काहीतरी चमकताना दिसले. त्याने ते उचलून घरी नेले. वडिलांना दाखवले. आपल्याला सोने सापडले, पण ते त्याच्या मालकापर्यंत पोहोचवायचे असा निश्चय महेश, त्याचे वडील आणि मित्राने केला. सलग तीन आठवडे मित्रपरिवारात चर्चा केली. फोटो पाठवले. या चर्चांमधून बनोटी येथील कापड दुकान मालकाने त्यांच्या सहकारी दुकानदाराचे ब्रेसलेट हरवल्याचे सांगितले. यातूनच ब्रेसलेटच्या मालकाचा शोध लागला.
प्रामाणिकपणाचा सत्कार
आपले ब्रेसलेट सापडल्याची बातमी मिळताच जळगाव येथून मिलिंद यांनी थेट बनोटी गाठले. महेशच्या वडिलांना ब्रेसलेट खरेदीची पावती, पीन नंबर दाखवला. त्यानुसार मिलिंद यांच्याकडे सोन्याचे ब्रेसलेट सोपवण्यात आले. व्यापारी मिलींद यांनी महेश खैरनार याला भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला. यावेळी सरपंच मुरलीधर वेहळे, मा. सरपंच सागर खैरनार, शालीक खैरनार, उमेश महालपुरे, संदिप सोनवणे, नाना सोनार, सचिन पाटील, विकास पवार, दादाराव पवार, प्रविण नाव्ही आदींसह ग्रामस्थांनी कौतुक करीत अभिनंदन केले.
इतर बातम्या-