नवी दिल्ली : सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईनुसार खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना तीन वर्ष जेलची शिक्षा भोगावी लागणार आहे (Punishment to Fake News Spreaders). दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोशल मीडियामार्फत खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याच्या बऱ्याच घटना याअगोदरही घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ, फोटो किंवा लेख शेअर करणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे.
खोट्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी समिती आयोजित करण्या आली आहे. या समितीला शांतता आणि सद्भाव समिती असं नाव ठेवण्यात आलं आहे. ही समिती एका एजन्सीमार्फत खोट्या बातम्यांची आणि त्या पसरवणाऱ्यंची माहिती काढणार आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे. खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना समिती पाठिंबा देणार आहे. याशिवाय माहिती देणाऱ्यांना बक्षिसही दिलं जाणार आहे. त्यासाठी एक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जारी केलं जाणार आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सद्भाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती दिल्ली हिंसाचारामागील कारण शोधत आहे. याशिवाय अशाप्रकारची दंगल घडू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर समिती काम करत आहे (Punishment to Fake News Spreaders).
कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांना या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीत या समितीची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
समिती मदतीसाठी लीगल एक्सपर्ट टीमची मदत घेणार आहे. ही एक्सपर्ट टीम एखादी तक्रार आल्यानंतर शेअर करणारी व्यक्ती खरच गुन्हेगार आहे की नाही? याबाबत समितीला माहिती देणार आहे. या कामात समिती काही सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचीदेखील मदत घेणार आहे.
दरम्यान, खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षिस म्हणून काही पैसे दिले जाणार, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी दिली. मात्र, माहिती देणाऱ्यांना नेमकं किती पैसे द्यायचे याबाबत अद्याप निश्चित असा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.