भारताचं प्रवेशद्वार, मुंबईचं हृदयस्थान Gate Way Of India ला मोठा धोका, नवा अहवाल काय सांगतो?
गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू भारताचं ऐतिहासिक प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.
रवि खरात, अलिबाग : मुंबईचं हृदयस्थान, मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाबद्दल मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तुला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीला येत्या वर्षात १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पुरातत्त्व विभागातर्फे इमारतीचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमारतीचा पाय आणि भिंती धोकादायक स्थितीत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
अहवालात काय खुलासा?
मुंबईत येणाऱ्या देशो-देशीच्या पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुरातत्व विभागातर्फे नुकतंच इमारतीचं ऑडिट करण्यात आलं. त्यानुसार इमारतीचा पाया आणि भिंतींना आता तडे जात आहेत. त्यामुळे संपूर्ण इमारत धोकादायक ठरू शकते. इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात सांगण्यात आलंय. राज्याच्या पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारला गेट वे ऑफ इंडियाची दुरुस्ती करून घेण्याची शिफारस केली आहे.
मुंबईची शान, ऐतिहासिक वास्तू
गेट वे ऑफ इंडिया ही वास्तु भारताचं ऐतिहासिक प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते. 1924 मध्ये मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं. तत्कालीन किंग जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी हे गेट बांधण्यात आल्याचं म्हटलं जातं. किंग जॉर्ज पंचम यांनी भारत दौऱ्याचा प्रवास येथूनच केला. याच गेटमधून त्यांनी मुंबई आणि भारतात प्रवेश केला. विशेष म्हणजे ब्रिटिशांची शेवटची तुकडीदेखील याच गेट वे ऑफ इंडियातून भारत सोडून निघून गेली होती. त्यानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला.
दुरुस्तीची जबाबदारी कुणाची?
गेट वे ऑफ इंडिया या वास्तुच्या देखभालीची जबाबदारी सध्या महाराष्ट्र राज्याची आहे. अनेक वर्षांपासून या वास्तुकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजूर होईल आणि धोकादायक अवस्थेत जाणाऱ्या या इमारतीची दुरूस्ती केली जाईल, अशी अपेक्षा आहे.