वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी संगमनेरमध्ये वंजारी समाजाचा भव्य मोर्चा
वाढीव वंजारी आरक्षणाच्या (Vanjara Reservation) मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज (17 सप्टेंबर) संगमनेर प्रांतकार्यालयावर वंजारी समाजाच्यावतीने भव्य मोर्चा (Vanjari Arakshan Morcha Sangamner) काढण्यात आला.

अहमदनगर : वाढीव वंजारी आरक्षणाच्या (Vanjara Reservation) मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज (17 सप्टेंबर) संगमनेर प्रांतकार्यालयावर वंजारी समाजाच्यावतीने भव्य मोर्चा (Vanjari Arakshan Morcha Sangamner) काढण्यात आला. या मोर्चात महिला, तरुणी, विद्यार्थ्यांसह हजारोंच्या संख्येने वंजारी समाज सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज घेऊन निघालेल्या या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सध्या राज्यभरात वंजारी समाजाकडून अशाप्रकारचे मोर्चे काढून आपल्या मागण्या मांडल्या जात आहेत.
वंजारी समाजाच्या या मोर्चाला दुपारी 12 वाजताच्या सुमारास संगमनेर येथील जाणता राजा मैदान येथून सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरुन जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांतकार्यालयासमोर धडकला. यावेळी मोठ्या संख्येने वंजारी समाज मोर्चात सहभागी झाला होता. वंजारी समाजाला केवळ 2 टक्के आरक्षणाची तरतुद आहे. या आरक्षणात 10 टक्क्यांनी वाढ करावी, जातीनिहाय जनगणना करावी, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ स्थापन करावे, वंजारी समाजासाठी जिल्हानिहाय वस्तीगृह चालू करावे, उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे आणि नोकरभरतीतील अन्याय दूर करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान, प्रांतकार्यालयासमोर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं. वंजारी समाजाच्या विविध नेत्यांनी या सभेत आपली भूमिका मांडली. निवडणुकीपुर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा वंजारी समाजाने मोर्चावेळी जाहीर केला. त्याबाबत मोर्चेकऱ्यांच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. वंजारी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार वंजारी आरक्षणावर काय तोडगा काढणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमकी मागणी काय आहे?
राज्यात वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. शिवाय राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या मतदान प्रक्रियेवर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. 1995 मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाला ओबीसीमधून काढून एनटीमध्ये स्वतंत्र समावेश केला. त्यावेळी दहा टक्के आरक्षण अटीला होते. पण एनटीमध्ये अ,ब,क आणि ड तयार केल्यामुळे वंजारी समाजाला नोकऱ्यात कमी जागा मिळायला लागल्या.
जिथे 100 जागा असतील, तिथे केवळ दोन जागांवर वंजारी समाजाला समाधान मानावं लागत आहे. त्यामुळेच आता वंजारी समाजाने एल्गार पुकारलाय. सरकारने वंजारी समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं, तसं न झाल्यास पुन्हा ओबीसीत समाविष्ट करून घ्यावं, अशी मागणी करत वंजारी समाजाने राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे.