Rajsthan : करौली हिंसेनंतर राजस्थानातील ब्यावर शहरात रक्तपात, दोन गटांतील हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
अजमेरच्या ब्यावर शहरात घडलेला हिंसक प्रकार समोर आला आहे. दुचाकी उभी केल्यामुळे इथे दोन गटांत वादविवाद निर्माण झाला आहे. तणाव निर्माण होऊन दोन गटांतील वाद मारहाणीपर्यंत पोहचला.
राजस्थान : राजस्थानमध्ये (Rajasthan) करौली हिंसेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत अजमेरच्या ब्यावर (Beawar) शहरात घडलेला हिंसक प्रकार समोर आला आहे. दुचाकी उभी केल्यामुळे इथे दोन गटांत वादविवाद निर्माण झाला आहे. तणाव निर्माण होऊन दोन गटांतील वाद मारहाणीपर्यंत पोहचला. दरम्यान एका गटातील डजनभर लोकांनी लाठ्या आणि लोखंडी रॉडने दुसऱ्या गटावर हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर एका इसमाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, करौली येथील हिंसेप्रकरणीही 33 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत. हे फुटेज पाहून आरोपींना ताब्यात घेतलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. करौलीत काल रात्रीपासूनच संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली असून अफवांचे पीक रोखण्यासाठी इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
दुचाकी उभी केल्यामुळे वाद
राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील ब्यावरमधील उदयपूर रोडवरील भाजी मंडईत मयत व्यक्तीचं भाजीचं दुकान आहे. रविवारी सकाळी मयत व्यक्तिच्या मुलाने आपली दुचाकी दुकानाबाहेर उभी केली होती. दरम्यान जवळच्या दुकानात आलेल्या भाजीने भरलेल्या एका जीपने दुचाकीला धडक दिली. या कारणामुळे मृत व्यक्ती आणि दुकानदार यांच्यात खडाजंगी झाली. वाद शिगेला पोहचला, वादाचं रूपांतर मारामारीत झालं. या घटनेत दुचाकी उभी करणाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे दोन मुलंही या घटनेत जखमी झाले आहेत.
अजमेरचे एसपी ब्यावरमध्ये दाखल
माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले. या हत्येनंतर शहरात तणाव निर्माण झालाय. घटनेचं गांभीर्य ओळखून अजमेर एसपी विकास शर्मा देखील ब्यावरमध्ये दाखल झालेत. सोबतच सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमित मेहरडा यांनी परिसरात गस्त घालून वातावरणाचा आढावा घेतला आहे. शांती आणि सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय.
पोलीस घेणार CCTV चा आधार
मीडिया रिपोर्ट्सनुसार या घटनेबद्दल माहिती देताना सहाय्यक पोलीस अधीक्षक सुमित मेहरडाने सांगितलं कि दोन गटांत मारहाण झाली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून त्या दिशेने कारवाई सुरु आहे. CCTV चा आधार घेऊन पुढील तापासणी करण्यात येणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
इतर बातम्या: