विजय मल्ल्याला ईडीचा दणका; फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता जप्त

| Updated on: Dec 04, 2020 | 9:01 PM

कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने जोरदार दणका दिला आहे. (Vijay Mallya's property in France worth Rs 14 crore seized, says ED)

विजय मल्ल्याला ईडीचा दणका; फ्रान्समधील 14 कोटींची मालमत्ता जप्त
विजय माल्ल्या
Follow us on

नवी दिल्ली: कर्जबुडवा उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने जोरदार दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याची फ्रान्समधील 1.6 मिलियन युरोची म्हणजे 14 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. किंगफिशर एअरलाइनसाठी आफरातफर करून 10 हजार कोटींचं कर्ज घेतल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. हे कर्ज फेडण्याऐवजी 2016मध्ये त्याने भारतातून पळ काढला होता. त्याला फरारही घोषित करण्यात आलं आहे. (Vijay Mallya’s property in France worth Rs 14 crore seized, says ED)

विजय मल्ल्याची ही मालमत्ता फ्रान्स येथील 32 Avenue FOCH या पत्त्यावर नोंद होती. ईडीने कारवाई करून तात्काळ ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. या मालमत्तेची किंमत 14 कोटी आहे. ही कारवाई केल्यानंतर ईडीने ट्विट करून तशी अधिकृत माहितीही दिली आहे. ईडीने 25 जानेवारी 2016 रोजी किंगफिशर एअरलाइन्स, विजय मल्ल्या आणि इतरांविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयारच्या आधारे धन शोधन निवारण अधिनियम, 2002 (PMLA) अॅक्ट अंतर्गत चौकशी सुरू केली होती.

प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

प्रत्यार्पणाद्वारे विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारताने यापूर्वीच ब्रिटनला मल्ल्याचं प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. युकेच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 10 डिसेंबर 2018 रोजी मनी लॉन्ड्रिंगचा आरोपी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. मल्ल्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सबळ पुरावे आहेत, त्यामुळे हे आदेश देण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानंतर त्याने या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून ब्रिटनच्या उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्याच्या याचिका फेटाळण्यात आल्या होत्या.

31 बँकांचे कर्ज

मल्ल्याने बँकांचं दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून भारतातून पळ काढला होता. 2016 मध्ये तो इंग्लंडला पळून गेल्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु झाली. मल्ल्यावर जवळपास 31 बँकांचं कर्ज आहे. कोणत्याही परिस्थिती मल्ल्याला भारतात आणलं जाणार आहे. यापूर्वीच ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेलाही मंजुरी दिली होती. मल्ल्यावर भारतातून पळ काढल्यानंतर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांद्वारेच त्याची हजारो कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली. फसवणूक, पैशांची अफरातफर आणि Foreign Exchange Management Act (FEMA) असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. (Vijay Mallya’s property in France worth Rs 14 crore seized, says ED)

 

संबंधित बातम्या:

विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात मिळणार का? आज सुनावणी

विजय मल्ल्याला भारताकडे सोपवा, लंडनमधील कोर्टाचे आदेश

महाराष्ट्र महामंथन : विजय मल्ल्याच्या प्रकरणावर नितीन गडकरींचं स्पष्टीकरण

(Vijay Mallya’s property in France worth Rs 14 crore seized, says ED)