‘चिकन 65’मधील ‘65’ म्हणजे नेमकं काय?
मुंबई : तुम्ही ‘चिकन 65’ ऐकलंच असेल. नुसतं ऐकलं काय, अनेकांनी तर चवीने खाल्लं सुद्धा असेल. मात्र, तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का, की या ‘चिकन 65’मधील ‘65’ चा नेमका अर्थ तरी काय बुवा? प्रश्न पडला, पण उत्तर सापडलं नाही?… फार ताण घेऊ नका, आम्ही तुम्हाला या ‘65’ अंकामागची काही कारणं सांगणार आहोत. अर्थात, […]
मुंबई : तुम्ही ‘चिकन 65’ ऐकलंच असेल. नुसतं ऐकलं काय, अनेकांनी तर चवीने खाल्लं सुद्धा असेल. मात्र, तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का, की या ‘चिकन 65’मधील ‘65’ चा नेमका अर्थ तरी काय बुवा? प्रश्न पडला, पण उत्तर सापडलं नाही?… फार ताण घेऊ नका, आम्ही तुम्हाला या ‘65’ अंकामागची काही कारणं सांगणार आहोत. अर्थात, हे सारे अंदाजच आहेत. पण यातलंच एखादं असावं, असा आमचाही कयास आहे.
अंदाज क्रमांक 1. काही वर्षांपूर्वी दक्षिण भारतामध्ये सर्वच रेस्टॉरंट आणि बारमध्ये एक ट्रेंड होता की, कोण किती मिर्च्या खाऊ शकतं? यावर एका हॉटेलचालकाने एक डिश बनवली. ज्यात प्रत्येक एक किलो चिकनमध्ये 65 मिर्च्या असायच्या, तेव्हापासून हे नाव प्रचलित झाले असे म्हणतात.
अंदाज क्रमांक 2. 1965 मध्ये चेन्नईच्या बुहारी रेस्टॉरंटने या डिशची सुरुवात केली, असेही म्हटले जाते. 1965 साल म्हणून ‘65’ नाव पडलं, असे म्हणतात. याच रेस्टॉरंटमध्येच चिकन 78, चिकन 82 आणि चिकन 90 अशाही डिश आहेत. त्यांनी या डिश अनुक्रमे 1978, 1982 आणि 1990 या साली सुरु केल्या. त्यामुळे चिकन 65 बाबत सुद्धा असेच घडले असावे, असा अंदाज आहे.
अंदाज क्रमांक 3. चिकन 65 बाबत आणखी एक अंदाज बांधला जातो, तो म्हणजे एका डिशमध्ये चिकनचे अचूक 65 पीस दिले जायचे आणि मसालेसुद्धा 65 प्रकारचेचे होते. त्यामुळे हे नाव देण्यात आले असावे.
अंदाज क्रमांक 4. शेवटचा अंदाज उत्तर भारतातील आहे. उत्तर भारतातील सैनिक जेव्हा दक्षिण भारतात तैनात केल जायचे, तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात मोठी समस्या भाषेची होती. चेन्नईच्या हॉटेलमध्ये मेन्यूही तामिळ भाषेत असायचा. त्यावेळी बरेच जण मेन्यू कार्डमधील आपल्या आवडत्या डिशच्या समोरचा नंबर सांगून ऑर्डर करायचे. याचवेळी 65 नंबरची डिश म्हणून सांगितले जायचे. त्यामुळे याचे नाव चिकन 65 पडले, असाही एक अंदाज आहे.
एकंदरीत ‘चिकन 65’ मधील ‘65’चा नेमका अर्थ काय, हे जरी ठामपणे कुणी सांगू शकत नसला, तरी भारतात याचे अंदाज मात्र शेकडोंनी आहेत. अर्थात, आम्हीही त्यातले चार अंदाज, जे काहीसे पटणारे वाटतात, ते सांगितले. तुमच्या भागात सुद्धा ‘चिकन 65’मधील या ‘65’चा आणखी वेगळा अंदाज असेल, यात दुमत नाहीच.