Mega Block : मेगा ब्लॉक म्हणजे काय असतो ? का घ्यावा लागतो ? मेगाब्लॉक नेमका कधीपासून सुरु झाला ?

दर रविवारी मुंबईकरांना मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. मेगाब्लॉकची बातमी पाहूनच मुंबईकरांना पुढील नियोजन करावे लागते. रेल्वेचे एक अधिकारी समुद्राखालून जाणारी रेल्वे पाहण्यासाठी परदेशात गेले होते. नेमका रविवार असल्याने मेगाब्लॉकमुळे तेथील ट्रेन बंद होती, असा अनुभव त्यांनी कथन केला आणि म्हणाले की आपल्या येथे मेगाब्लॉकलाही आम्ही ट्रेन चालवितो...!

Mega Block : मेगा ब्लॉक म्हणजे काय असतो ? का घ्यावा लागतो ?  मेगाब्लॉक नेमका कधीपासून सुरु झाला ?
story behind sunday mega block Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 3:18 PM

‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे  रविवार म्हटले की रेल्वेचा मेगाब्लॉक असे समीकरण झाले आहे. रविवारची साप्ताहिक सुटी असल्याने मुंबईकर आपल्या कुटुंबकबिल्यासह फिरायला बाहेर पडतात आणि नेमकी रेल्वेची अनाऊन्समेंट होते, ‘यात्रीयों को होनेवाली असुविधा के लिए हमे खेद है.’  तर दर रविवारी असा ‘मेगाब्लॉक’ असा मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. आता तर मेगाब्लॉक आणि रविवार याच नातं असं जुळलं आहे की एखाद्या रविवारी रेल्वेचा ‘मेगाब्लॉक’ नसेल तर मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसतो. परंतू दररोज रेल्वेची वाहतूक सुरळीत चालण्यासाठी मेगाब्लॉक गरजेचा असतो. कारण मुंबईतील उपनगरीय यंत्रणेवर रेल्वेच्या गाड्यांच्या वाहतूकीचा सर्वाधिक ताण आहे. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मिळून एकूण 3,204 लोकल फेऱ्या चालविल्या जातात. त्यातच लांबपल्ल्यांच्या आणि मालगाड्याही त्याच रुळांवरुन धावतात. त्यामुळे रुळांची झीज होते. रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर उपकरणांची वेळोवेळी तपासणी करावी लागते. अन्यथा अपघात होऊ शकतो. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी ‘मेन्टेनन्स ब्लॉक’ची गरज लागते.

कारण मुंबई शहरातील सर्व कार्यालये दक्षिण मुंबईत वसली आहेत, तर रहीवासी सर्व उत्तरेला उपनगरात रहात आहे, त्यामुळे सकाळी पिक अवरला दक्षिण मुंबईच्या दिशेने सर्व नोकरदार प्रवास करतात, तर संध्याकाळी उलट दिशेला त्यांचा प्रवास सुरु होतो. त्यामुळे लोकल प्रचंड गर्दी होत असते. दक्षिण मुंबईतील काही सरकारी कार्यालये हलविण्याची मागणी नेहमी केली जाते. किंवा शिफ्ट नूसार कामगारांना वेगवेगळ्या वेळते कामावर बोलविल्यास पिकअवरमधील लोकलची गर्दी कमी काही प्रमाणात कमी होईल असे म्हटले जाते.

पिकअवर म्हणजे काय ?

मुंबईतील कार्यालयाच्या वेळानुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मॉर्निंग पिकअवर म्हटला जातो. सायंकाळी हा पिकअवर सायंकाळी  5 ते  9 या काळात असतो. या पिक अवरला जर एखादा तांत्रिक बिघाड झाला तर लोकलचे वेळापत्रक बिघडून प्रचंड गर्दी वाढते.  पिकअवरला जादा गर्दी होत असल्याने पश्चिम रेल्वेवर दर तीन मिनिटांना एक लोकल चालविली जाते. तर मध्य रेल्वेवर दर चार मिनिटांना एक लोकल चालविली जाते.

कधी न झोपणारं शहर

मुंबई शहराचा विकास रेल्वेमुळे झाला आहे. मुंबईच्या लाईफ लाईन लोकल रेल्वेने दररोज साधारण 75 ते 78  लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची सख्या कोराना काळापूर्वी 42 लाख होती. तर पश्चिम रेल्वेवरुन रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या 35 होती. कोरोना काळानंतर या संख्येत थोडी घट झाली आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घ्यावा लागतो. या मेगाब्लॉक मध्ये रुळांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात. रेल्वे आठवडाभर सुरळीत सुरु राहण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घ्यावा लागतो. मुंबई शहराला कधी न झोपणारे शहर म्हटले जाते. खरेतर मुंबईच्या लोकल सेवे मुळेच मुंबई जागी रहाते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री उशीरा 12.24 वाजता सुटलेली शेवटची कर्जत लोकल कर्जत लोकल मध्यरात्री 2.45 वाजता कर्जतला पोहचते.

मध्यरात्री नाईट ब्लॉक

मध्यरात्री  मिळालेल्या एक दोन ते तीन तासांच्या गॅपचा मेंटेनन्ससाठी फायदा उचलण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जातो. त्यामुळे ज्यावेळी रात्रीच्या उपनगरीय सेवा बंद होतात. तेव्हा नाईट ब्लॉक घेतला जातो. परंतू त्यावेळी देशाच्या अनेक राज्यातून लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस शहरात प्रवेश करीत असतात, त्यामुळे गाड्यांच्या दळणवळण सुरु असतानाचे धोका पत्करुन मेगाब्लॉक घेतला जात असतो. यासाठी गॅंगमन, पॉईंटमेन्स यांच्या शरीरावर रात्रीच्या प्रकाशात चकाकणारं भगव्या रंगाची रेडीयम परिधान करायला दिलेले असते. जेणे करून रुळांवर पेट्रोलिंग किंवा दुरुस्ती करणारा कामगार लांबूनही मोटरमनला ओळखता यावा अशी माहीती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

ट्रॅकमन्स रेल्वेचे डोळे आणि कान

मध्य आणि पश्चिम रेल्वे दर आठवड्यात विविध ठिकाणी ‘मेगाब्लॉक’ घेत असते. एखाद्या सेक्शनमधील वाहतूक अन्य मार्गाने वळवून त्या सेक्शनची रुळ दुरुस्ती, रुळ बदलणे किंवा ओव्हरहेड वायरची दुरुस्ती आदी कामे रेल्वे करीत असते. रेल्वेचे कान, डोळे आणि नाक मानले जाणारे रेल्वेचे ‘फूट सोल्जर’ म्हणजे ‘गॅंगमन’ होय. या उन्हा तान्हात, पावसात अविरत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर रेल्वे निर्धोकपणे गाड्या चालवित असते. या रेल्वेच्या गॅंगमन किंवा ट्रॅकमन्सच्या जीवाला नेहमीच धोका असतो.

पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली जाते

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे दर रविवारी किंवा शनिवारी रात्री नाईट ब्लॉक घेऊन काम करते. दर आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेगाब्लॉकचे काम केले जाते. कधी ठाणे-कल्याण यादरम्यान डाऊन धिम्या मार्गावर, कधी मुलुंड-माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर, कधी हार्बर रेल्वेच्या कुर्ला-मानखुर्द दरम्यान मार्गावर, कधी चर्चगेटमार्गावर मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर. मेगाब्लॉक घेतला जातो. परंतू ज्यावेळी धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जातो. तेव्हा वाहतूक जलद मार्गाने वळविली जाते. या मेगाब्लॉक संदर्भात वेळापत्रक स्टेशनमास्तर रेल्वे स्थानकांवर बोर्डावर चिकटवितात. त्यामुळे प्रवाशांना माहीती मिळते. किंवा हल्ली तर मोबाईलवर विविध माध्यमातून मेगाब्लॉकची माहीती दिली जाते.

कुठे ब्लॉक घ्यायचा ते कसे ठरते ?

दर आठवड्याला मेगा ब्लॉकसाठी नेमक्या रेल्वेच्या कोणत्या सेक्शनची निवड करायची, हे ठरवण्यासाठी आठवडाभर रेल्वे कर्मचाऱ्यांची तयारी सुरू असते. रेल्वेचा कणा मानले जाणारे गँगमनना पेट्रोलिंगची ड्यूटी दिलेली असते. ते दोघांच्या जोडीने रुळांकडे पाहात निरीक्षण करीत पायी फिरत असतात. त्यांच्यात होताडी असते. ते प्रत्येक रुळाची कि तपासतात आणि हातोडीने ठोकून टाईट करतात. गॅंगमन किंवा ट्रॅकमन हे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या सेक्शनमध्ये अक्षरश: रेल्वे रुळांवरून पायी फिरत असतात. दोघादोघांच्या जोडीने फिरणारे हे कर्मचारी त्या सेक्शनमधील रुळांची, सिग्नलच्या पॉइंट्सची आणि ओव्हरहेड वायरची स्थिती तपासतात. एखादा रूळ सीक असला म्हणजे रुळात काही दोष आढळला तर त्या जागी लाल रंगाची एक खूण केली जाते. सिग्नल यंत्रणेच्या पॉइंट्समध्ये काही कामे करायची असल्यास, त्याची नोंद ठेवली जाते. त्यानंतर मग या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी अशा तीन विभागांकडे पाठवल्या जातात. त्यानंतर या विभागाकडून परिचालन विभागाला मेगाब्लॉकची तरतूद करण्यासाठी पत्र लिहीले जाते. त्यानंतर परिचालन विभागातील अधिकारी गाड्यांचे वेळापत्रक एखादा सण असेल किंवा इतर घटना आदी गोष्टींचा विचार करून मग ‘मेगा ब्लॉक’चे वेळापत्रक निश्चित करतात.

 मेगाब्लॉकचा इतिहास नेमका काय ?

मध्य रेल्वेने देखील त्यांचे 3000 मेगाब्लॉकची प्रेसनोट 7 नोव्हेंबर  2021 रोजी काढली होती अशी माहीती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेने साल 1997 मध्ये मुख्य मार्गावर आणि साल 2000 मध्ये हार्बरमार्गावर मेगा ब्लॉकची सुरुवात केल्याचे तत्कालीन मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी प्रेसनोटमध्ये म्हटले होते. तर पश्चिम रेल्वेने सात वर्षांपूर्वी 7 एप्रिल 2017 रोजी मरीन लाईन्स आणि माहीम दरम्यान 10.35 ते 3.35 दरम्यान घेतलेला मेगाब्लॉक हा 1000 वा मेगाब्लॉक असल्याची प्रेसनोट काढली होती.

आठवडाभर चुस्त रहाण्यासाठी…

आठवडाभर संपूर्ण यंत्रणा चुस्त आणि तंदुरुस्त रहाण्यासाठी आठवड्यातून एकदा रविवारी मेन्टेनन्सची कामे केली जातात.  कधी ब्रिज पादचारी पुलांची उभारणी, किंवा जुन्या पादचारी पुलांचे किंवा रेल्वे उड्डाण पुलांचे पाडकामाकरण्यासाठी किंवा नवीन पुलाचे गर्डर टाकण्यासाठी, नदीवरील पुलांच्या दुरुस्तीसाठी देखील स्पेशन पॉवरब्लॉक घेतले जातात.

 रात्री शेवटची लोकल पोहचण्यापूर्वी पहाटेची पहिली लोकल सुरु होते

मुंबई शहर कधी झोपत नाही असे म्हटले जाते. परंतू या शहराला जागे ठेवण्याचे काम लाईफ लाईन लोकल करीत असते. मध्ये रेल्वेवर पहिली लोकल पहाटे 4.19 वाजता ( कसारा ) सुटते तर शेवटची लोकल रात्री 12.31 वाजता सुटते. म्हणजे रात्रीचे साडे तीन तास लोकल सेवा बंद असते. परंतू हे तितके खरे नाही का ? कारण मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटीतून रात्री12.31 वाजता कुर्ला ही शेवटची लोकल सुटते. तर शेवटची कर्जत रात्री 12.24 वाजता सुटते आणि शंभर किलोमीटरचे आणि दोन तास 20 मिनिटांचे अंतर कापत ही ट्रेन मध्यरात्री 2.45 वाजता कर्जतला पोहचते. परंतू आश्चर्य म्हणजे ही ट्रेन पोहचण्याआधीच मध्यरात्री 2.33 वाजता कर्जतहून मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालेली असते. ही ट्रेन पहाटे पाच वाजता सीएसएमटीला पोहचते. नव्या वेळापत्रकात आता खास कामगारांच्या मागणीवरून कसारा येथून सकाळी सुटणारी पहिली लोकल 4.25 ऐवजी आता 34 मिनिट आधी म्हणचे 3.51 वाजता सोडण्यात येते.सध्या मध्ये रेल्वेवर दररोज 1810 लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. या फेऱ्यांना चालविताना 15 डब्यांच्या 22 फेऱ्या तर वातानुकूलित 66 फेऱ्या चालविण्यात येतात. पश्चिम रेल्वेवर दररोज 1,394 लोकल चालविण्यात येत असून त्यातील एसी लोकलची संख्या 96 इतकी आहे. पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्याच्या एकूण 199 लोकल चालविण्यात येत आहेत.

रेल्वेचे जाळे किलोमीटरमध्ये

सीएसएमटी ते कसारा  – अंतर 121 किलोमीटर

सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्ग – अंतर 49 किलोमीटर

चर्चगेट ते डहाणू रोड – अंतर 123 किलोमीटर

पुणे ते लोणावळा – 65 किलोमीटर

तीन दिवसीय महा मेगा ब्लॉकचा फायदा काय ?

मध्य रेल्वेने तीन दिवसांचा महा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. पहिला ब्लॉक 63 तासांचा आहे. त्यात ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी 2 ते 3 मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे जलद गाड्या तसेच लांबपल्ल्यांच्या गाड्या पकडताना होणाऱ्या चेंगचेंगरी पासून दिलासा मिळणार आहे. तर दुसरा ब्लाॉक 36 तासांचा असून यात सीएसएमटी स्थानकातील फलाट क्र. 9 आणि 10 ची लांबी वाढविण्याबरोबर इंटर लॉकिंग तसेच सिंगल आणि इतर यंत्रणा बदलण्यात येणार आहे. काही जुन्या पिट लाईन तसेच वॉशिंग प्लांट बंद केले जाणार आहेत. इंटरसिटी आणि इतर मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा देणारे लांब पल्ल्याचे फलाट क्र. 9 ते 14 पर्यंतचे हे प्लॅटफॉर्म एकदा का नव्या एलएचबी डब्यांच्या गाड्यांच्या लांबीनूसार वाढविल्यास जादा लांबीच्या ट्रेन येथून सुटतील,त्यामुळे जादा संख्ये प्रवाशांना आसने मिळतील. सध्याच्या जुन्या गाड्यांच्या 12 किंवा 18 डब्यांऐवजी नवीन रचनेत 24 पर्यंत डब्यांच्या ट्रेनना येथे थांबा मिळेल.पुढे, व्यस्त सीएसएमटी-दादर विभागातील लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या वेग देखील वाढविण्यास मदत मिळेल असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.