पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशपातळीवरील सक्षम पर्याय म्हणूनही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाहिले जात आहे.(know about sharad pawars powerful politics in 12 point)

पवारांनी जो चमत्कार महाराष्ट्रात केला, तो देश पातळीवर करतील?; समजून घ्या 12 पॉईंटमधून!
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 2:52 PM

मुंबई: सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेलं अपयश, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदारांनी नाकारणं, काँग्रेसकडे असलेली नेतृत्वाची वाणवा आणि त्यातच विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरू केलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची मोट बांधली जावी, अशी अपेक्षाच काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या काँग्रेससह तिसऱ्या आघाडीने पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंच तर महाराष्ट्रात जो चमत्कार घडला, तोच चमत्कार ते देश पातळीवर करतील काय? याबाबतचा 12 मुद्द्यांमधून घेतलेला हा आढावा… (know about sharad pawars powerful politics in 12 point)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशपातळीवरील सक्षम पर्याय म्हणूनही शरद पवारांकडे पाहिले जात आहे. पवारांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेला मोठ्या शिताफिने भाजपपासून दूर करून संयुक्त पुरोगामी आघाडीत घेतले, तसाच चमत्कार ते देशपातळीवरही घडवून आणू शकतात, असा विश्वास वाटू लागल्यानेच त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याची खेळी आता राष्ट्रीय स्तरावर होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात काय घडले?

महाराष्ट्रात 2019ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्तपणे लढवली. तर शिवसेना आणि भाजपनेही युती करून ही निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर बंद दाराआड झालेल्या चर्चेचा हवाला देत शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. या निवडणुकीत 105 जागा मिळविलेल्या भाजपने अवघ्या 56 जागांवर निवडून आलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्या मागे फरफटत येण्याशिवाय शिवसेनेला पर्यायच नाही, शिवसेना कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही, या मानसिकतेत भाजप होती. एकवेळ शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाईल, पण काँग्रेस कधीच शिवसेनेशी हात मिळवणी करणार नाही. त्यामुळे आपण देऊ ते आणि सांगू तसंच असंच शिवसेनेला वागावं लागेल, असं भाजपला वाटत होतं.

मात्र, दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेनेची अस्वस्थता नेमकी हेरली आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून आघाडीचं घोडं दामटवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेनेशी आघाडी करण्याची गरज, भाजपचं वाढतं आव्हान पटवून देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या नव्या राजकीय समीकरणासाठी राजी केलं. त्यानंतर सत्तेचा फॉर्म्युला ठरला आणि अशक्य वाटणारं तसेच सर्वांनाच अचंबित करणारं नवं राजकीय समीकरण राज्यात निर्माण झालं. या नव्या समीकरणास काँग्रेस आणि शिवसेनेने साथ दिली असली तरी त्यामागचा मुख्य ब्रेन हा पवारांचाच होता.

मायावती, ममता बॅनर्जी आणि डाव्यांनाही एकत्र आणण्याची ताकद

आज बसपाच्या अध्यक्षा मायावती, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तिकडे आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससोबत जायला तयार नाहीत. शिवाय डावेही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. अशावेळी या सर्व पक्षांना पवारच एकत्र आणू शकतात. या सर्व पक्षांच्या नेत्यांशी पवारांचे चांगले संबंध आहेत. त्यांना राजकीय परिस्थिती पटवून देण्याची कला पवारांना अवगत असल्याने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास महाराष्ट्रा सारखा चमत्कार ते देशपातळीवर नक्कीच घडवून आणू शकतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

भूकंप व्यवस्थापनात तरबेज

शरद पवार हे भारतीय राजकारणातील चाणक्य समजले जातात. राजकीय हवा कोणत्या दिशेने जात आहे, याचा अचूक अंदाज त्यांना येतो. त्यामुळे त्यांची राजकीय गणितंही त्याच दिशेने सुरू असतात. पवारांकडे राजकीय अंदाज घेण्याचं असलेलं कसबही त्यांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवू शकतं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. शिवाय पक्षांतर्गत होणारी बंडाळी, राजकीय भूकंप याचं व्यवस्थापन करण्यातही ते तरबेज आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान झाल्यास त्याचा त्यांना फायदाच होऊ शकतो, असं जाणकार सांगतात.

मोदीही पवारांना गुरु मानतात

पवार केवळ विरोधी पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षातही तेवढेच लोकप्रिय आहेत. देशात कोणतीही समस्या उद्भवली तर आजही केंद्रातील आणि राज्यांमधील नेते त्यांचा सल्ला घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पवारांना गुरु मानतात. पवारांचे बोट पकडून मी राजकारणात आलोय असं जाहीर वक्तव्यही मोदी यांनी केलं होतं. त्यावरून पवारांचं राजकीय वजन किती आहे हे दिसून येतं.

अभ्यासू नेता

देशातील राजकारण, ग्रामीण जीवन, उद्योग व्यवसाय, शेती, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण यांचा अभ्यास असलेल्या देशातील मोजक्या नेत्यांपैकी पवार हे एक नेते आहेत. देशात एवढा अभ्यासू आणि अनुभवी नेता नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यास त्यांना सर्वच राजकीय पक्षातून पाठिंबा मिळू शकतो. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, शरद यादव आदी नेते अभ्यासू असले तरी आता ते राजकारणात सक्रिय नाहीत. पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षीही राजकारणात सक्रिय असून ही त्यांची जमेची बाजू असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (know about sharad pawars powerful politics in 12 point)

पवारच का?, मोदींसमोर तगडं आव्हान देणारा एकमेव नेता

2019च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व नाकारलं. त्यांच्या राजकीय अनुभवावरून त्यांच्यावर नेहमीच टीका केली गेली. सोनिया गांधी या सुद्धा आजारी असतात. प्रियांका गांधी या अजूनही संसदीय राजकारणात नाहीत. काँग्रेसमधील बुजुर्ग नेत्यांना मतदार कधीच स्वीकारणार नाहीत. तसेच विरोधी पक्षात मायावती, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, शरद यादव आदी नेत्यांना म्हणावा तसा जनाधार राहिलेला नाही. मोदींसमोर लागणारं मास अपिलिंगही या नेत्यांकडे नाही. त्या तुलनेत पवारांचा जनाधार मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात दखलपात्रं आहे. शिवाय पवारांना संपूर्ण देश ओळखतो. अभ्यासू, जाणता नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय देशपातळीवर सर्व पक्षांची मोट बांधू शकेल असे पवार हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पवार हे पंतप्रधानपदाचे उमदेवार म्हणून घोषित झाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा चमत्कार घडू शकतो. पवारांच्या माध्यामातून तगडं आव्हान उभं राहू शकतं, असं राजकीय अभ्यासक सांगतात.

तिसऱ्या आघाडीचा पर्याय आणि प्रयत्न

राजकारणाच्या हवेचा अंदाज असलेल्या पवारांनी मोदींचा केंद्रीय राजकारणात उदय होताच तिसऱ्या आघाडी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. मोदी लाटेमुळे काँग्रेस इतक्यात सत्तेत येऊ शकत नसल्याचा अंदाज आल्याने त्यांनी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यास सुरुवातही केली होती. परंतु, काँग्रेसला आपणच सत्तेत येऊ असे वाटल्याने जागा वाटपांमध्ये आघाडीचं गणित फिसकटलं. शिवाय काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवारही जाहीर केला नाही. त्यामुळेही आघाडीचं घोडं गंगेत न्हालं नाही. पुढे पवारांनी राष्ट्रीय स्तरावर आघाडी होत नसेल तर प्रादेशिक स्तरावर काँग्रेसने सर्व पक्षांशी आघाडी करून भाजपला थोपवावं, असा पर्यायही त्यांनी सूचवला होता. पण ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही. (know about sharad pawars powerful politics in 12 point)

पवारांपुढेचे पर्याय

पवारांना पंतप्रधानपदाचे उमदेवार म्हणून घोषित केल्यास त्यांना सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचं कसब पणाला लागेल. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला, त्याचाच कित्ता राष्ट्रीय पातळीवर गिरवण्यासाठी त्यांना त्यांचे वजन खर्ची घालावे लागेल. अशावेळी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एक भक्कम आघाडी तयार करणं किंवा प्रादेशिक स्तरावर जो पक्ष मजबूत असेल त्या पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात भक्कम लढत उभी करणं, हे दोन प्रयोग पवारांकडून राबवले जाऊ शकतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पुलोद सरकार, पवार आणि प्रयोग

पवारांनी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्याचा प्रयोग केला. राज्यात नवी समीकरणं निर्माण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण राजकीय प्रयोग करणं पवारांसाठी तसं नवं राहिलेलं नाही. 1978मध्ये काँग्रेसमध्ये असलेल्या पवारांनी पहिल्यांदाच ‘पुलोद’चा प्रयोग करून राजकीय निरीक्षकांना बुचकाळ्यात पाडलं होतं. त्यावेळी पवार हे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. त्यावेळी अधिवेशन सुरू असतानाच काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यावेळी पवारांसोबत 38 आमदार बाहेर पडले. पवारांनी दादासाहेब रुपवते यांच्यासोबत ‘समांतर काँग्रेस’ या नव्या पक्षाची स्थापना केली. अधिवेशनात राजकीय घडामोडी घडत असतानाच वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पवार विधिमंडळात जनता पक्षाबरोबरच्या बैठकीत सामिल झाले. त्यावेळी चंद्रशेखर आणि एस. एम. जोशी यांनी पवारांकडे नव्या सरकारची सूत्रं देण्याची घोषणा केली आणि राज्यात ‘पुरोगामी लोकशाही दला’ची (पुलोद) स्थापना झाली. (know about sharad pawars powerful politics in 12 point)

विरोधकांना सोबत घेण्याची किमया

पवारांनी पुलोदच्या प्रयोगात राज्याच्या राजकारणात कधी न झालेल्या गोष्टी केल्या. राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार आणण्याबरोबरच जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांनाही त्यांनी सोबत घेतलं. या प्रयोगामुळे पवार पॉवरफुल नेते म्हणून उदयाला आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयोग

1999मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदास भाजपने विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या विदेशीत्वाचा मुद्दा उचलण्यात आला होता. त्यामुळे पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून लोकभावना कळवली. पण पक्षाने या तिन्ही नेत्यांना काँग्रेसमधून निलंबित केले. त्यामुळे पवारांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून घवघवीत यश मिळविले. काँग्रेसलाही राज्यात चांगलं यश मिळालं. पण राष्ट्रवादीशी आघाडी केल्याशिवाय सत्तेत बसणं शक्य नसल्याने काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आधी राष्ट्रवादीचा प्रयोग आणि नंतर काँग्रेसशी पर्यायाने सोनिया गांधींशी जुळवून घेण्याचं कसबही पवारांनी करून दाखवलं.

विश्वासाचा प्रश्न

पवार हे संधीसाधू नेते आहेत. ते बोलतात एक आणि करतात वेगळं असं नेहमी बोललं जातं. त्यामुळे त्यांच्या विश्वासहार्यतेचीही राजकारणात चर्चा होत असते. पण असं असलं तरी पवारांना टाळून देशाचं राजकारण कुणालाही करणं शक्य नाही. पवारांचं महत्त्व, अभ्यास, प्रश्नांची जाण, त्यावरील असलेली अचूक तोड आणि राजकारण कोणत्या दिशेला जाईल, याचा अंदाज त्यांना असल्याने पवारांचं केंद्रीय राजकारणातील महत्त्व अबाधित असल्याचंही राजकीय निरीक्षक सांगतात. (know about sharad pawars powerful politics in 12 point)

संबंधित बातम्या:

शरद पवारांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे, काँग्रेसची गळ?

शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला

(know about sharad pawars powerful politics in 12 point)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.