नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्या समित ठक्कर या तरुणाला नागपूर पोलिसांनी आज (24 ऑक्टोबर) अटक केली आहे. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे (Youth arrested for defaming CM Uddhav Thackeray on social media).
समित ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी सुरु केली होती. तो मुख्यमंत्र्यांना अपमानित करणारा मजकूर सतत पोस्ट करत होता. याबाबत धर्मेंद्र मिश्रा यांनी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर समित हा पोलिसांना सापडत नव्हता (Youth arrested for defaming CM Uddhav Thackeray on social media).
या प्रकरणी धर्मेंद्र मिश्रा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 1 ऑक्टोबर 2020 रोजी हायकोर्टाने समित याला पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर समित 5 ऑक्टोबर रोजी वी. पी. पोलीस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांसमोर दाखल झाला. मात्र, काही वेळातच तो बाथरुमला जातो असं सांगून पळून गेला.
दरम्यानच्या काळात सायबर पोलिसांनी समित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सुरुवातीला समित ठक्कर याला त्याचा लॅपटॉप, मोबाईल पोलिसांसमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही. ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिल्यावर कोर्टाने पुन्हा आरोपी समित याला वी. पी. रोड पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे जाऊन तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले.
समित याला हे आदेश 16 ऑक्टोबर रोजी दिले. मात्र, त्याने हा गुन्हा रद्द करावा म्हणून नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी (24 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समाज माध्यमांवर सतत बदनामी करणाऱ्या समित ठक्कर याला नागपूर पोलिसांनी अटक केली.