तुम्ही खाताय भेसळयुक्त मसाले? साध्या सोप्या पद्धतीत ओळखा भेसळमुक्त मसाले
बाजार मिळणारे भेसळयुक्त मसाले खास असाल तर सावधान... अगदी सोप्या पद्धतीत घरीच ओळख मसाले भेसळयुक्त आहेत की भेसळमुक्त... या सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही ओळखू शकता की तुमचे मसाले खरे आहेत की भेसळयुक्त...

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला सकस पदार्थांची गरज आहे. कोणताही पदार्ख बनवायचा असेल तर, तिखट, हळदी, गरम मसाला, जीरा पावडर इतर मसाल्यांची गरज भासते. पण पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही जे मसाले वापरत आहात ते भेसळयुक्त आहेत की भेसळमुक्त… याबद्दल तुम्हाला देखील माहिती नसेल. कारण मसाले भेसळयुक्त आहेत की भेसळमुक्त हे ओळखणार कसं? हा फार मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही घरातच अगदी सोप्या पद्धतीत भेसळयुक्त आणि भेसळमुक्त मसाले ओळखू शकता.
काही सोप्या टिप्स आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही खरेदी केलेल्या मसाल्यात भेसळ आहे की नाही हे तुम्ही घरच्या घरी तपासू शकता. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या टिप्सबद्दल.
हळद : अधिक चमकदार दिसण्यासाठी हळद पावडरमध्ये मिथेनिल यलो किंवा क्रोम पावडर मिक्स केली जाते. हे तपासण्यासाठी चिमूटभर हळद पावडर थोड्या ओल्या हाताने घ्या आणि चोळा. ज्यामुळे हाताला हलकं पॉलिश केल्याचा भास होत असेल किंवा रंग खूप उजळ असेल तर त्यात भेसळ असू शकते.




मिरची पावडर : लाल मिरची पावडरमध्ये अनेक वेळा सिंथेटिक रंग, वीट पावडर किंवा मीठ पावडर टाकली जाते. हे तपासण्यासाठी एका ग्लास पाण्यात मिरची पावडर टाकून ढवळा. जर लाल रंग पाण्यात लवकर पसरत असेल तर त्यात कृत्रिम रंगाची भेसळ असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
धने पावडर : अनेक वेळा इतर बियांची पावडर, पिवळा रंग किंवा इतर बनावट गोष्टी धने पावडरमध्ये मिसळल्या जातात. हे तपासण्यासाठी तुमच्या हातात थोडी धने पावडर घेऊन ती चोळा. विचित्र वास येत असेल किंवा रंग बदलू लागला तर त्यात भेसळ असू शकते.
गरम मसाले : गरम मसाल्यातील भेसळ तपासण्यासाठी पाण्यात टाका. जर ते पाण्यात तरंगायला लागले किंवा पाण्याचा रंग बदलला तर समजावे की त्यात भेसळ आहे. खरा गरम मसाला नेहमी पाण्यात स्थिर होतो आणि त्याचा रंग बदलत नाही.
मिठ : जर मीठ खूप पांढरं आणि चमकदार दिसत असेल तर पांढरेपणा वाढवण्यासाठी त्यात केमिकल मिक्स केलं असेल. भेसळमुक्त मीठ हलकं पांढरं किंवा गुलाबी रंगाचं असतं.
जीरा : जिऱ्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात अनेक वेळा पॉलिशिंग केमिकल किंवा बनावट बिया टाकल्या जातात. हे तपासण्यासाठी तळहातावर जिरे चोळा, हाताला तेलकट वाटत असेल आणि विचित्र वास येत असेल तर त्यात भेसळ असू शकते.
सांगायचं झालं तर, मसाल्यांची शुद्धता खूप महत्त्वाची आहे कारण बनावट मसाले आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. बनावट मसाल्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या, ऍलर्जी आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. घरबसल्या या सोप्या चाचण्यांद्वारे तुम्ही तुमचे मसाले खरे आहेत की नाही हे ओळखू शकता.