चेहरा उजळवणारे क्रीम लावत असाल तर डॉक्टरांचा हा सल्ला मानावा, अन्यथा होईल मोठे नुकसान
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक क्रीम्समध्ये मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड्स मिसळलेले असतात, जे आपल्या त्वचेसाठी अतिशय हानिकारक असते.
नवी दिल्ली – सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात सगळ्या लोकांना सुंदर दिसण्याची इच्छा आहे. बाजारात अशी अनेक फेअरनेस (रंग उजळवणारी) क्रीम्स (fairness creams) उपलब्ध आहेत, जी चेहऱ्यावरील डाग हटवतात पण त्यासह तुम्हाला सुंदर बनवण्याचाही दावा करतात. अशा परिस्थितीत तरुण पिढीतील अनेक लोक मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ही क्रीम्स विकत घेतात, मात्र त्यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान (skin problems) होऊ शकते. ही क्रीम्स लावल्याने चेहरा लालसर होणे, ॲलर्जी (allergy) येणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या क्रीम्समध्ये स्टेरॉईडसह (steroids) यूजेनॉल आणि सिट्रोनेलोल यांचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये अनेक हानिकारक तत्वं असतात, त्यामुळे त्वचा खराब होते व नुकसान होऊ शकते.
दिल्लीतील आरएमएल रुग्णालयातील त्वचा रोग विभागात ओपीडी मध्ये रोज अशा केसेस येतात, जेथे स्टेरॉईड्स असलेली क्रीम्स लावल्याने तरुणांचा चेहरा खराब झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जळजळ होणे तसेच त्वचेचा रंग काळवंडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये चेहरा खूप खराबही झाला होता. ही परिस्थिती पाहता रुग्णालयातील त्वचा रोग विभागातील डॉक्टरांनी रुग्णांना जागरूक करण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे. ज्याद्वारे बाजारात उपलब्ध असलेल्या चेहऱ्याला लावण्यात येणाऱ्या क्रीम्सच्या हानिकारक प्रभावाबद्दल रुग्णांना माहिती देण्यात येते.
त्वचेचे होते मोठे नुकसान –
आरएमएल रुग्णालयातील डर्मिटॉलॉजी विभागातील डॉ. मनीष जांगडा यांनी टीव्ही9 भारतवर्षशी बोलताना सांगितले की, बाजारात अशी अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत, जी चेहऱ्यावरील काळे डाग काढून त्वचा उजळवण्याचा किंवा गोरी करण्याचा दावा करतात. ही क्रीम्स मेडिकलमध्ये काऊंटवर उपलब्ध असतात, त्यामुळे अनेक लोक मेडिकलमधून ती क्रीम्स सहज विकत घेऊ शकतात. पण त्यामुळे त्वचेला खाज सुटणे, ॲलर्जी होणे, त्वचा काळवंडणे आणि त्वचा पातळ होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. स्टेरॉइडयुक्त क्रीम लावल्यामुळे चेहरा खराब झाल्याची अनेक प्रकरणे विभागात दररोज येत आहेत.
डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे –
डॉ. मनीष यांच्या सांगण्यानुसार, चेहऱ्यावर काही डाग असतील तर सर्वप्रथम त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी लिहून दिलेल्या औषधांचे सेवन करावे. टीव्हीवरील जाहिरात पाहून किंवा एखाद्या मित्राचा सल्ला ऐकून चेहऱ्याला लावण्याचे कोणतेही क्रीम विकत घेऊ नये. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड्स असतात, जे आपल्या त्वचेसाठी हानिकारक असते.
शरीरातील मेलॅनिनची पातळी किती आहे, यावर आपल्या त्वचेचा रंग अवलंबून असतो, असे डॉ. मनीष यांनी स्पष्ट केले. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक क्रीम्समध्ये हायड्रोक्विनोनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.