Cough Syrup Issue: कफ सिरपचा वापर कशाला , करून पहा हे घरगुती उपाय
गांबिया नावाच्या देशात 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. किडनीमध्ये बिघाड झाल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचे दिसून आले.
गांबिया देशात कफ सिरपमुळे (cough syrup) 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून सध्या वातावरण तापलेले आहे. किडनीमध्ये बिघाड झाल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आलं होतं. भारतात थोडा जरी सर्दी-खोकला (cough and cold) झाला तर लोकं लगेच कफ सिरपचे सेवन करतात. मात्र या समस्येवरही उपाय आहे. खोकला झाल्यावर दरवेळेस बाजारातील औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी (home remedies) खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो. सर्दी खोकला झाल्यास आपल्या स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील काही पदार्थांचा वापर करणेही उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.
आलं – आलं हा असा पदार्थ आहे, जो प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतोच. अनेक जण आलं घालून केलेला चहा पिणं पसंत करतात. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे सर्दी-खोकला दूर करण्यात उपयुक्त ठरतात. तुम्हाला खोकल्याचा खूप त्रास होत असेल तर आलं किसून किंवा ठेचून त्याचा रस काढावा व तो सेवन करावा. अन्यथा आलं पाण्यात घालून ते उकळूनही पिऊ शकता. खोकला कमी होण्यास मदत होईल.
हळद – सर्वांच्या स्वयंपाक घरात हमखास आढळणारा आणखी एक पदार्थ म्हणजे हळद. त्याचा उपयोग केवळ जेवणासाठी किंवा सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जात नाही तर हळद ही आरोग्यासाठीही खूप उत्तम व फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये ॲंटी- बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. आयुर्वेदातही हळदीचे अनेक उपयोग सांगितले आहे. मुलांना सर्दी अथवा खोकला झाला असेल तर त्यांना हळद घातलेले दूध पिण्यास द्यावे.
मध – मध हा एक ऑलराऊंडर घटक आहे, जो त्वचा, केस आणि आरोग्य या तिन्हींसाठी फायदेशीर असते. मुलांना सर्दी किवा खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यांना मध सेवन करण्यास देऊ शकता. अथवा त्यांना मध व आल्याचा रस एकत्र करूनही त्याचे चाटण देऊ शकता.
मुलेठी – आपली आजी-आई यांच्या काळापासून घशाच्या समस्या दूर करण्यासाठी मुलेठीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात मुलेठी सहज मिळते. ती विकत घेऊन त्याची पेस्ट बनवावी व त्याचे सेवन करावे. काही वेळातच तुम्हाला फरक दिसून येईल व खोकल्याचा त्रास कमी होईल.